पनवेल मनपा क्षेत्रात दुसर्‍या डोसचे लसीकरण 100 टक्के पूर्ण!

 

पनवेल (प्रतिनिधी) - कोविड 19 लसीकरणाचे पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार महापालिकेने योग्य नियोजन केल्यामुळे महापालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील नागरिकांचा 100 टक्के कोविड लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानूसार 16 जानेवारी 2021 ला महापालिका क्षेत्रात कोविड लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांचे यामध्ये पेालिस विभाग, महसूल विभाग आदि कर्मचार्‍यांचा समावेश होता. तिसर्‍या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर 45 ते 60 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. चौथ्या टप्प्यात 18 वर्षावरील नागरिकांचे तर आता पुढील टप्प्यात 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे.

पालिका हद्दीतील ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रत्येक गाव - पाड्यांवर लसीकरण सत्र उभारण्यात आले. यामुळे पहिल्या डोसचे 100% गावांचे लसीकरण होऊ शकले. शासकीय ओळखपत्र नसणार्‍यांचे विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात वारांगना, बेडरिडन, गर्भवती, दिव्यांग अशा विविध घटकांना सामावून त्यांचे विशेष लसीकरण करण्यात आले. पालिका हद्दीतील विविध वृध्दाश्रम, तळोजा जेल याठिकाणीही लसीकरण करण्यात आले. तसेच वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरण केंद्राबाबत माहिती देण्याकरिता टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता.

लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होण्याकरीता 79 खाजगी रुग्णालयांना अर्बन टास्क फोर्स अंतर्गत मान्यता देऊन जवळपास 150 खाजगी लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील लसीकरण व मोठ्या सोसायट्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण झाले. मिशन कवच कुंडल अंतर्गत पहिल्या डोसचा लक्षांक पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या ’हर घर दस्तक’ अभियानांतर्गत कोविड लसीकरणाबाबत आरोग्य कर्मचारी पुनश्च: सर्वेक्षण केले. ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे अशा नागरिकांची नाव नोंदणी करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.  शहरी भागात 25 लसीकरण केंद्र सुरु असून ग्रामीण भागात 30 ठिकाणी आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. 

दरम्यान, ज्या नागरिकांचे दुसर्‍या डोसचे लसीकरण राहीले आहे त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी सातत्याने केले होते. ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच सोसायटी किंवा नागरिकांच्या मागणीनूसार लाभार्थ्याची जास्त असेल तर अशा ठिकाणी लसीकरणाचे खास कॅम्प् लावण्यात आले. कोविन पोर्टलच्या साह्याने ज्या लाभार्थींचा दुसरा डोस राहिला आहे ,अशा नागरिकांना वॉर रूमव्दारे  एसएमएस व फोनकॉलच्या माध्यमातून लसीकरणास प्रवृत्त करण्यात आले. बाजार पेठांमध्येही जनजागृती करण्यात आली.  पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लसींचे लसीकरण पुर्ण करण्यांकरिता पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने भोंगा गाडी व त्या सोबत लसीकरण वाहिका (वॅक्सीनेशन व्हॅन) सर्वत्र फिरविण्यात आली. या सर्व प्रयत्नांमुळे महापालिकेचे कोविडच्या दुसर्‍या डोसचेही 100 टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे. हे अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजारवर, डॉ. मनिषा चांडक यांनी सूक्ष्म नियोजन केले. 

 सध्या 15 ते18 वयोगटातील लसीकरणावर महापालिका भर देत असून पहिल्या व दुसर्‍या डोसचे शाळांशाळांमध्ये कॅम्प लावण्यात येत आहेत. या लसीकरणासाठी सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. तसेच बुस्टर डोसचेही लसीकरण सुरू आहे. आरोग्यकर्मी (हेल्थ वर्कर) , पहिल्या फळीतील कोरोना योध्दे( फ्रन्ट लाईन वर्कर )तसेच व्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस दिला जात आहे. 9 ते 5 या वेळेत प्रिकॉशन डोस सहा शासकीय लसीकरण केंद्रावर विनामूल्य देण्यात येत आहे.  पनवेल महापालिका हद्दीत एकुण लोकसंख्या        8,14,000 इतकी आहे. त्यापैकी लाभार्थी संख्या 5,98,127 इतकी असून पहिला डोस 6,80,478 जणांनी घेतला असून ही टक्केवारी 113.77% इतकी आहे तर दुसरा डोस 6,06,170 जणांनी घेतला असून बुस्टर डोस घेणार्‍यांची संख्या 1,44,786 इतकी असून ही टक्केवारी 2.47%इतकी आहे.