नवी मुंबई (प्रतिनिधी) - वायु प्रदुषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोजा औद्योगिक परिसरातील 11 कंपन्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावत चांगलाच दणका दिला आहे. यात चार कंपन्यां बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून एका कंपनीला योग्य त्या दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तळोजाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांकडून होणार्या वायु प्रदुषणामुळे शेजारील रहिवाशांच्या आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्यांबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेवून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सदरची ही कारवाई केली असल्याचे समजते.
एमआयडीसी परिसरात खारघर आणि तळोजा भागात रासायनिक कंपन्यांनी रसायने आणि वायू दर्शनी भागात सोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यानुसार, सदर कंपन्यांनी वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकार्यांनी चार कंपन्यांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून एका कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत.
याविषयी माहिती देतांना तळोजा येथील एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी सचिन आडकर म्हणाले, रासायनिक वायु प्रदुषणाचे प्रकार हे बहूतांशवेळा रात्रीच्या सुमारास होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दक्षता पथकांकडून नियमितपणे तळोजा एमआयडीसी परिसरातील औद्योगिक युनिट्सची रात्री तपासणी केली जात आहे. त्यानुसार प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई केली आहे. यात तळोजा एमआयडी मधील ज्या चार कंपन्यांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात रचना ऍग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड, मालमो स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड, सिद्धिविनायक फिश मील्स आणि स्कॉटिश केमिकल या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, जॉन्सन मॅथे केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्कॉटिश केमिकल इंडस्ट्रीज आणि म्हैसूर अमोनिया प्रायव्हेट लिमिटेड, लासन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तैयो निप्पॉन सॅन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तर बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडला काही निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित कारखान्यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.