कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू प्रकरण! आंदोलनानंतर 12.80 लाखांची भरपाई देण्याचे एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे आश्‍वासन

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - महापेतील एल अंँड टी कंपनीत औषध फवारणीचे काम करत असतांना तेथील लोखंडी अँगल डोक्यात पडून, नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या विनोद विष्णू भोईटे नावाच्या औषध फवारणी कामगाराचा दुर्देवीरित्या अपघाती मृत्यू शुक्रवारी झाला होता. दरम्यान, सदर कामगाराच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटूंबास एल अँड टी कंपनीने योग्य ती आर्थिक नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी भोईटे याच्या कुटूंबियांसह समाज समता कामगार संघातर्फे करण्यात आली होती. मात्र सदर कंपनी व्यवस्थापन याबाबत लेखी देण्यास मनाई देत असल्यामुळे काल सोमवारी सदर कंपनीच्या गेटवर भोईर यांचा मृतदेह असलेली अ‍ॅम्बुलन्स नेवून आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, या आंदोलनानंतर कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगार विनोद विष्णू भोईटे यांच्या नातेवाईकांना 12 लाख 80 हजार रुपये इतकी रक्कम कामगार भरपाई आयुक्त यांच्यामार्फत देण्याचे तसेच या व्यतिरिक्त तीन महिन्याचा पगारही देण्याचे मान्य केले आहे. मात्र याबाबत कंपनी व्यवस्थापनाने लेखी स्वरुपात हे मान्य केले नसल्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा समाज समता संघाने दिला आहे. दरम्यान, मृतदेहाची विटंबना व अवहेलना होऊ नये यासाठी आंदोलन जास्त न ताणता  सर्व सोपस्कार पार पडल्यावर कुटुंबीयांसोबत पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. 

दरम्यान, मृत भोईटे यांना त्यांचा मित्र अमर कांबळे याचे राहुल कंस्ट्रक्शन कंपनीचे मार्फत एल अँण्ड टी कंपनी, महापे येथे चालु असलेल्या कामाच्या ठिकाणी फवारणी करण्याचे काम मिळाले असल्याने ते सदर ठिकाणी देखील आवश्यकता असेल तेव्हा कामासाठी जात असत. त्यानुसार दि.4 फेबु्रवारी रोजी ते सदरठिकाणी गेले असता, त्यांचा झालेल्या अपघाती घटनेत मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत भोईटे यांच्या पत्नीने तुर्भे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी,राहुल कंस्ट्रक्शनचे अमर कांबळे व एल अँण्ड टी कंपनीचे सदर ठिकाणचे सुपरवायझर व कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.