राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई बेकायदा मद्यासह इको कार व दुचाकी असा एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

 


पनवेल (वार्ताहर) - राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतून विदेशी मद्याच्या साठ्यासह एक इको कारसह दुचाकी असा एकूण 14 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग ठाणे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी भरारी पथक ठाणे विभाग, विभागीय भरारी ’पथक ठाणे निरीक्षक, पनवेल शहर आदी सर्वांच्या पथकाने तुर्भे रेल्वे स्टेशन समोर येथे सापळा रचला असता, सुनिल शांतीभाई वाघेला (वय 35 वर्षे) रा. धारावी मुंबई, उमेश जितेंद्र दुबे (वय 33 वर्षे)रा. कांदिवली व तुर्भेगावातील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा एकूण तिघा जणांच्या ताब्यातील  इको (टॅक्सी व्हॅन)मधुन 05/1000 मिली. क्षमतेच्या बनावट स्काँच मद्याच्या सिलबंद बाटल्या, 50/1000 मिलीच्या विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल संच मिळुन आले. त्यानंतर सदर तिघांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्या भाडेतत्वावरील से-19 मधील कोपरखैरण्यातील घरात पथकाने छापा टाकुन सदरठिकाणाहून विदेशी बनावट स्कॉचच्या 48/1000 मिली., 02/2000 मिली, 03/700 मिली क्षमतेच्या विविध ब्रॅण्डच्या बनावट स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या तसेच 857/1000 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, 800 विविध ब्रॅण्डचे लेबल. 02 ड्रायर व 02 टोचे असा मुदेमाल मिळुन आला. यानंतर बजरंग बेकरी समोर साईबाबा मंदिराजवळ तुर्भेगाव से-22 येथे एक पांढर्‍या रंगांची अँक्टीव्हा दुचाकी व विदेशी मद्याचा 04/1000 मिलीच्या बाटल्या व एक मोबाईल असे एकुण अवैद्य विदेशी बनावट स्कॉचा साठा असा एकूण 14 लाख 25 हजार 240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही कारवाई पार पडली आहे.