नवी मुंबईत 14 गावांचा समावेश करण्याचे एकनाथ शिंदेंचे आश्वासन

 


मुंबई - नवी मुंबईत भांडर्ली तसेच आसपासच्या 14 गावांचा समावेश करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

त्यांनी ही माहिती ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही 14 गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आहे.

ग्रामपंचायत या 14 गावांमध्ये असल्यामुळे वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. झपाटयाने शहरीकरण वाढत असल्यामुळे हा विकास या गावांतही व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. काही वर्षांपूर्वी ही गावे महापालिकेतून ग्रामस्थांच्या विरोधामुळे वगळली होती. आता पुन्हा ती समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधी गावे वगळा, यासाठी हिंसक झालेले ग्रामस्थ आज एवढ्या वर्षांनी महापालिका हवी, अशी मागणी करू लागले आहेत.

या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी होती. नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मी दिले आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तपासून तो निर्णय घेतला जाईल. सर्व 14 गावांचा विकास महत्वाचा आहे. पालिकेच्या, राज्य सरकारच्या, नगरविकासाच्या माध्यमातून लोकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

नवी मुंबई महापालिकेत सुरुवातीला ही 14 गावे होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर ती वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. हा वाद एवढा टोकाला गेला होता की गावातून निवडणूक अर्ज दाखल करणार्‍या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने ती गावे वगळली. या काळात कोणतेही ठोस नियोजन प्राधिकरण नसल्यामुळे गावांचा विचका झाला. तळोजा, कल्याण, शिळ रस्त्यावर प्रचंड गोदामे उभी राहिली. आता ग्रामस्थ पुन्हा गावे महापालिकेत घ्या अशी मागणी करत आहेत.

या ग्रामस्थांनी महापालिका नको म्हणत ग्रामपंचायत स्वीकारली. या गावात जागोजागी बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. शीळ तळोजा मार्गावर असलेली बेकायदा गोदामही या गावाची देण आहे. या रस्त्यावर मोठे भंगार माफिया खेटून व्यवसाय करतात. त्याकडे लक्ष द्यायची ग्रामपंचायतीची कुवत नव्हती आणि दुसरीकडे जिल्हा प्रशासन, पोलिसांनी डोळेझाक केली. महापालिका त्यावर वरचेवर कारवाई करत होती.

गावातील एका मोठ्या गटाला गावातील मोकळ्या गुरचरण जमिनीवर आरक्षण पडेल, अशी भीती होती. शिवाय भंगार गोदाम मालक आणि जमीन मालकी असलेले ग्रामस्थ, त्यांचे पुढारी अशी मोठी साखळी महापालिका नको, यासाठी आग्रही राहिली. ग्रामस्थ नेत्यांच्या बोलण्यात आले, हिंसक झाले आणि याचमुळे पुढे गावांचा विचका झाला होता.