14 गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - ना.एकनाथ शिंदे

 



ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेच्यावतीने भंडार्ली येथे कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत असून या प्रकल्पांस स्थानिक नागरिकांनी सहमती दर्शविली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार असून 14 गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भंडार्ली येथे उभारण्यात येणार्‍या प्रकल्पासंबंधी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष समिती समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीस महापौर नरेश म्हस्के, आ. प्रमोद पाटील, माजी आ. सुभाष भोईर, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, नगरसेवक रमाकांत मढवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 1) अंबुरे, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, भंडार्ली संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील तसेच इतर प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते. भंडार्ली येथील प्रकल्पासंदर्भात 14 गावाच्या प्रतिनिधींनी शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेवून याबाबत सकारात्मक चर्चा केली होती, या चर्चेदरम्यान स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शनिवारी पालकमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचर्‍याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मौजे भंडार्ली येथील जागा इतकी खाजगी जागा तात्पुरती भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागेवर कचर्‍याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, दुर्गंधी येणार नाही याची सर्वोतोपरी काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे कोणताही विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी भंडार्ली संघर्ष समिती पदाधिकार्‍यांना केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत  सर्व स्थानिक नागरिकांनी प्रकल्पास सहमती दर्शविली आहे.या परिसरातील 14 गावांचा विकास करतांना महापालिका, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ज्या-ज्या सुविधा देता येतील त्या देण्याच्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. महापालिका प्रशासनाच्यावतीने भंडार्ली येथील 14 गावांच्या स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत 1 वर्षाकरिताच हा प्रकल्प राबविला जाईल हा विश्वास देत नागरिकांनी  सामंजस्याची भुमिका घेतल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.