नवी मुंबई (प्रतिनिधी) - शहर स्वच्छतेत अडथळा आणणार्या रस्त्यांवरील बेवारस वाहने उचलण्याची कारवाई केली जाते. वर्ष 2016 ते आजतागायत महापालिकेकडून अशा प्रकारे रस्त्यावर पार्क केलेल्या व बंद अवस्थेतील एकूण 2116 बेवारस वाहने उचलण्याची कारवाई केली असून सदरच्या या वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली असून, नियमानुसार शुल्क भरून संबंधित वाहन मालकाने आपले वाहन सोडवून नेण्याचे जाहीर आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेने कारवाई करून उचलण्यात आलेली सदरची ही वाहने महापालिकेच्या कोपरखैरणे येथील डंपींग ग्राऊंडवर तसेच ऐरोली व महापे येथे जमा करण्यात आलेली आहेत. या वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली असून येत्या 15 दिवसांच्या आत नियमानुसार शुल्क भरून ही वाहने संंबंधित वाहन मालकांनी न नेल्यास ही वाहने भंगारजमा करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील कलम 230 अन्वये महापालिका आयुक्त यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर वा पदपथावर कोणतीही वस्तू ठेवण्यास मनाई आहे. परंतू, आजमितीस शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठया प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठया प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्याठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही व शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. याबाबत महापालिकेमार्फत अशी वाहने हलविणेबाबत संबंधितांना वारंवार आवाहन करण्यात येत असून अशा वाहनांवर रितसर नोटीसाही संबंधित विभाग कार्यालयामार्फत लावण्यात आल्या आहेत. तथापि अनेक वाहन मालकांकडून त्याबाबत प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सदर जमा करण्यात आलेल्या 2126 वाहनांची सूची नवी मुंबई महापालिकेच्या ुुु.पााल.र्सेीं.ळप या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
ज्या मालकांची ही वाहने आहेत त्या वाहन मालकांना या जाहीर आवाहनव्दारे कळविण्यात येते की, संबंधित मालकाने हे जाहीर आवाहन प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित वाहनाची मूळ कागदपत्रे दाखवून विभाग कार्यालयात नियमानुसार शुल्कचा भरणा करावा व वाहन जमा असलेल्या ठिकाणाहून आपले वाहन स्वखर्चाने घेऊन जावे.उर्वरित वाहनांबाबत यापुढील काळात नवी मुंबई महापालिका कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारणार नाही याबाबत उप प्रादेशिक वाहतूक अधिकारी (संबंधित) यांनी नोंद घ्यावी. जे वाहन मालक 15 दिवसांच्या आत वाहन घेऊन जाणार नाहीत, अशी वाहने नवी मुंबई महानगरपालिकेकडून बेवारस वाहन म्हणून घोषित केली जातील. तद्नंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 79 अन्वये घोषित केलेल्या वा बेवारस ठरविलेल्या वाहनांची महापालिकेमार्फत निविदा काढून भंगारात विक्री करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत सूचित करण्यात येत आहे.