नवी मुंबई (प्रतिनिधी) - आ.गणेश नाईक यांनी काल ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौर्यात त्यांनी विकास कामांना गती देण्याची सूचना अधिकार्यांना केली. ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आ.संदीप नाईक यांच्यासह माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभापती अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील व अन्य माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आ. संदीप नाईक यांनी पर्यटकांना आकर्षित करेल आणि नवी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवेल असं सेंटर ऐरोली येथे उभ रहावं, अशी मागणी सर्वप्रथम केली होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या केंद्राच्या कामाला गती मिळाली होती. विद्यमान आ. गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ऐरोलीतील या जैवविविधता केंद्रामध्ये सुमारे 30 कोटी रुपये खर्चून खारफुटीची माहिती देणार केंद्र आणि फ्लेमिंगोसह अन्य पक्षी त्याच बरोबर सागरी पक्षी, प्राणी माशांच्या प्रजाती यांची माहिती देणारं अध्यावत म्युझियम आता उभे राहणार आहे. या वास्तू उभ्या राहिल्यावर त्यांची देखभाल उत्तम प्रकारे करण्याची व्यवस्था निर्माण करण्याची सूचना जैवविविधता सेंटरच्या भेटीप्रसंगी आ. गणेश नाईक यांनी वनविभागाचे अधिकारी कोकरे यांना केली.
दिवा गाव आणि परिसरातील स्थानिक आगरी कोळी बांधव परंपरागत व्यवसायासाठी दिवा जेटीचा वापर वर्षानुवर्ष करीत आहेत. या जेट्टीची लांबी वाढविण्याची मागणी आ. गणेश नाईक यांनी केली होती व त्यानुसार या केंद्रातील विकास कामांमध्ये दिवा जेटीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या जेटीचा 24 तास वापर होण्यासाठी तिची लांबी वाढविण्याची मागणी आ. नाईक यांनी केली होती.
पर्यटकांनाही ओहोटीच्या वेळेस देखील ही जेटी वापरता येणार आहे. जैवविविधता केंद्रामध्ये नव्याने निर्माण होणार्या खारफुटी माहिती केंद्र आणि म्युझियम या प्रकल्पांमध्ये स्थानिक बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आ. गणेश नाईक यांनी केली आहे. त्याला वन अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ऐरोली काटई उन्नत मार्गावर काटई आणि मुंबई करिता चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याच्या मागणीबाबत आ. गणेश नाईक यांनी विधानसभेसह इतर विविध प्रकारे जोरदार आवाज उठवला होता. कालच्या या पाहणी दौर्यात त्यांनी एमएमआरडीए आणि पालिकेच्या अधिकार्यांना सडेतोडपणे इशारा दिला. या दोन्ही मार्गीकासाठी येत्या आठ दिवसात कार्यवाहीबाबत लेखी आश्वासन द्या अशी भूमिका आक्रमक भूमिका आ. नाईक यांनी यावेळी घेतलेली पाहता, एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी काटईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्याचे मान्य करतानाच मुंबई करिता चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी देखील मार्गीका ठेवू असे मान्य केले आहे.
सिग्नल विरहित ठाणे-बेलापूर मार्गासाठी रबाळे ते चिंचपाडा असा उड्डाणपूल बांधण्याची वेळ आली तर महापालिकेच्या माध्यमातून तो बांधून घेऊ अशी माहिती आ. नाईक यांनी यावेळी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोलीत नाट्यगृहाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाचा पाहणी दौरा देखील विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी काल केला. यात नाट्यगृहाच्या बेसमेंटचे काम प्रगतीपथावर असून सर्वात प्रथम वाहनतळ निर्मिती केली जाणार आहे व यामध्ये आतील आणि बाहेरील अशा 400 गाड्या ठेवता येणार आहेत.
आ. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून ऐरोलीत भव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. तत्कालीन महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे यांच्या कार्यकाळात या स्मारकाच्या कामाला गती मिळाली. आ. नाईक यांच्या सूचनेनुसार स्मारकाच्या कामासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली. या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र जीवन चरित्र त्यांचे विचार त्यांचे साहित्य त्यांच्याविषयीची सचित्र माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी याकरिता आ.गणेश नाईक यांनी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यावर जबाबदारी दिली होती अतिशय परिश्रम पूर्वक सोनवणे यांनी या स्मारकामध्ये या सर्व बाबी अंतर्भूत करून घेतल्या आहेत. या स्मारकासाठी आमदार नाईक यांनी त्यांचा 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला असून त्या अंतर्गत या स्मारकातील ऑडिओ-व्हिडिओ यंत्रणा तसेच आसन व्यवस्थेची कामे कामे करण्यात येणार आहेत. ज्या वेळेस या स्मारकाचे काम पूर्ण होईल त्यावेळेस मी समाधानी असेल अशी भावना आ. गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, या कामाचे श्रेय घ्यायचे त्यांनी ते घेऊ दे या शब्दात आ. नाईक यांनी विरोधकांना यावेळी फटकारलं. नवी मुंबईतील धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या गवळी देवचा पाहणीदौरा देखील आमदार गणेश नाईक यांनी केला. ऐरोलीचे माजी आ. संदीप नाईक यांच्या मागणीनुसार या पर्यटन स्थळी सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सुमारे 2.84 कोटी निधी वनविभागाला देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी वन विभागाकडे वर्ग केला होता. या निधी अंतर्गत झालेल्या कामांची माहिती यावेळी आ. नाईक यांनी घेत, पालिकेच्या आणि वन विभागाच्या अधिकार्यांना संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली. पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना तसे दूरध्वनीवरून कळवल्यानंतर लगेचच या दोन्ही विभागाची बैठक कालच पार पडली. त्यामध्ये कोणत्या सोयी सुविधा आणि कामे होणार आहेत याचे सादरीकरण वनविभागाला महापालिकेकडे करावे लागणार आहे या निधीमधून गवळीदेव पर्यटन स्थळी विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्यटनस्थळाचा लवकरच विकास होणार आहे.