नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होवू लागली आहे. त्यात काल नवी मुंबईत दिवसभरात अवघ्या 7 बाधितांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दप्तरी झाल्याने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, काल नवी मुंबईत 07 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आलेख कमी होत चालला असल्याचे दिसून येत आहे. दि.19 फेबु्रवारी रोजी 23 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर 20 व 21 फेबु्रवारी रोजी अनुक्रमे 29 व 12 बाधितांची नोंद झालेली असतांनाच काल दिवसभरात अवघ्या सात बाधितांची नोंद झाली. तर काल 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, नवी मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. या बरोबरच नवी मुंबईत आतापर्यंत एकूण 1 लाख 50 हजार 968 लोकांना कोरोनाची लागण झाली असून आजतागायत 2044 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. नवी मुंबईत सध्यस्थितीत उपचार सुरु असलेल्या सक्रिय रूग्णाची संख्या 291 इतकी झाली आहे.