खासदार सुप्रिया सुळेंना सलग 7 व्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर

 


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. सुळेंनी सलग 7 व्या वर्षी मानाचा पुरस्कार पटकावला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खासदारांना या फौंडेशनच्या माध्यमातून 2010 पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे संसदेमध्ये उत्कृष्ट कमगिरी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षातही लोकसभेत त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. लोकसभेच्या कामकाजात 1 जून 2019 ते 11 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 92 टक्के उपस्थिती लावत 163 चर्चांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये 402 प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

2021 वर्षातही लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेमध्ये सहभागासाठी सलग सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सोळाव्या लोकसभेत सुळेंनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चासंत्रात सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी एकूण 1186 प्रश्न उपस्थित केले होते. तर 22 खासगी विधेयके मांडली होती. त्यासाठी त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

गेल्या 12 वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत 75 खासदारांना तो देण्यात आला आहे. तसेच येत्या 26 मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

संस्थेच्या निवडक समितीने तामिळनाडूतील भाजपाचे जेष्ठ नेते एच.व्ही.हांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम वीरप्पा मोईली यांची नावे पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच संसदेच्या कृषी, वित्त, शिक्षण आणि कामगारांशी संबंधित चार समित्यांकडून त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.