नवी मुंंबई (प्रतिनिधी) - कुलस्वामी पतसंस्थेत झालेल्या घोटाळा प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून यात दोषी असणार्या संचालक मंडळावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ठाणे शहर उपनिबंधक यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
ठाणे शहर उपनिबंधक विशाल जाधववर यांना दिलेल्या निवेदनात मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले आहे की, कुलस्वामिनी पतसंस्था ही साधारण 38 वर्षे सेवा देत असून संपूर्ण महाराष्ट्रात पंतसंस्थेच्या एकुण 37 शाखा आहेत. या संस्थेत साधारण 150000 इतके सभासद आहेत. करोडो रुपये वार्षिक उलाढाल असणार्या या संस्थेत शाखा नूतनीकरण, नवीन शाखा सुरू करणे व या साठी नवीन जागा खरेदी करणे तसेच आर्थिक कामकाजात भ्रष्टाचार उघड झाल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत सहकार अपर निंबंधक पुणे डॉ.पी. खंडागळे यांच्या आदेशान्वये या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अन्वये, आपण सभासदांचे व ठेवीदारांचे हित/ पैसा लक्षात घेवून आपल्यावर असणार्या शासन-प्रशासन नियम अधिनियमानुसार पारदर्शकता ठेवून याप्रकरणी काम करावे. जेणे करून पतसंस्था भागधारक व सभासद यांचा संस्थेवर असणारा विश्वास कायम राहिल असे स्पष्ट करत, सदर प्रकरणी लेखापरिक्षक यांनाही दोषी ठरवण्यात यावे तसेच चौकशीत दोषी असणार्या संचालक मंडळावरही कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अश्या घटनांना आळा बसेल असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, मनसे सहकार सेनेच्या या निवेदनानंतर उपनिबंधक ठाणे शहर विशाल जाधवर यांनी याप्रकरणी पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर योग्य ते कारवाई करण्याचे तसेच पतपेढीच्या सभासदाना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येते. यावेळी निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यासह विनायक जाधव, आशिष मोरे, संकेत निवडुंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.