नवी मुंबई (प्रतिनिधी) - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा आवारात कांद्याची आवक चांगल्या प्रकारे होत असून कांद्याचे बाजारभाव स्थिर असून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे कांदा बटाटा मार्केटचे संचालक तथा व्यापारी अशोक वाळूंज यांनी सांगितले. बाजारात सध्या चांगल्या दर्जाचा लाल कांदा प्रती किलो 20 ते 30 रुपये दराने विकला जात असल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.
नवी मुंबईत नाशिक, मंचर, पुणे, तासगाव आदी भागातून कांद्याची आवक होत असते. रोज 100 ते दीडशे गाडया बाजारात येतात. बाजारात कांद्याचा चांगला पुरवठा होत असून चांगला भाव मिळत आहे. तर बटाट्याचा भाव 12 ते 15 रुपये असल्याचे वाळूंज यांनी सांगितले. कांदा बटाटा मार्केटमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व गुजरात याठिकाणाहून बटाट्याची आवक होते. कांद्याची आवक वाढली असून भाव स्थिर असल्याचे सांगण्यात येते. मात्र असे असले तरी पावसामुळे कांदा खराब झाल्यामुळे आगामी काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होवून कांदा महाग होण्याची शक्यता व्यापारी तोतलानी यांनी याविषयी बोलतांना व्यक्त केली आहे. बाजारात पांढरा कांदाही येत असून तो 25 ते 26 रूपये प्रतिकिलो विकला जात आहे तर बटाटा 10 ते 15 रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात असल्याचे व्यापारी तोतलानी यांनी सांगितले.