नवी मुंबई (प्रतिनिधी)- शिवसेना उपनेते,पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. भगव्या सप्ताहाचे व विजय नाहटा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तुर्भे नाका विभाग प्रमुख तय्यब पटेल यांच्या पुढाकारातून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुंबई आणि नवी मुंबई आणि इतर परिसरातून एकूण 32 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या उत्तुंग खेळाचे प्रदर्शन करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
या स्पर्धेचे उदघाटन माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत विजेते पदाचा मान उषा इंटरप्राइजेस या संघाने पटकावला. या संघास 33,333 रुपयांचे पारितोषिक आणि ट्राफी देवून सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेतील द्वितीय विजेत्या ठरलेल्या नेरुळ येथील नो कॉम्प्रेमाईज संघास रुपये 22222 तर तृतीय विजेत्या ठरलेल्या अथर्व 8 कोपरखैरणे या संघाला रूपये 14444 चे बक्षीस तसेच चौथे पारितोषिक म्हणून हनुमान नगरच्या टीमला 14444 रुपये आणि ट्रॉफीसह प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याहस्ते बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,जेष्ठ माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी,मिलिंद सूर्यराव,शहर प्रमुख विजय माने,प्रवीण म्हात्रे,उपशहर प्रमुख प्रदीप वाघमारे, महिला सहसंघटक शांताबाई कदम आदी उपस्थित होते.