नवी मुंबई महापालिकेच्या वन विभागास सुचना
नवी मुंबई (प्रतिनिधी)- परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षांचे नवी मुंबईत मोठया प्रमाणात होणारे आगमन व अधिवासाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्या अधिवास संरक्षणासाठी वनविभागाने उचित कार्यवाही करावी अशा सुचना नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वन अधिकारी ठाणे यांना केल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात टि. एस. चाणक्य (भारतीय समुद्री विश्वविद्यालय) नेरुळ, आणि एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सेक्टर-56, सिवूड्स, नेरुळ येथील मागील बाजूस विस्तृत सागरी खाडी (वनक्षेत्र) आहे. या भागात दरवर्षी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये साधारणत: नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात फ्लेमिंगो पक्षांचे मोठया प्रमाणात आगमन होत असते. त्यांचा अधिवास साधारणत: 3 ते 4 महिन्यांचा असतो. या पक्ष्यांमुळे नवी मुंबई शहराची ओळख फ्लेमिंगो सिटी’ म्हणून रुढ होताना दिसत आहे. तथापि काही व्यक्तींनी खाडीच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बांध घातल्याने सागरी भरती - ओहोटीच्या पाण्याची पाणथळ भागात ये -जा होत नाही, त्यामुळे सदर पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये बदल झाल्यास, फ्लेमिंगोचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो अशी चिंता काही पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त करण्यासह याबाबत काही वर्तमानपत्रातून याबाबत आवाजही उचलला गेला आहे. या सर्व बाबी पाहता, याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडेही या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आलेली आहे. त्यानुसार आयुक्तांनी विभागीय वन अधिकारी, ठाणे यांना पत्राव्दारे याबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन वस्तुस्थिती आढळल्यास फ्लेमिंगोचा अधिवास राहण्यासाठी आपल्या विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे सूचित केले आहे.दूर देशातून नवी मुंबईत थंडीच्या कालावधीत येणारे फ्लेमिंगो पक्षी हे नवी मुंबईच्या जैवविविधतेत लक्षणीय भर घालणारे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी वैभव आहे. आभाळाचे प्रतिबिंब पडलेल्या पाणथळ जागेतील निळ्याशार पाण्यावर हिरव्यागार वातावरणात फ्लेमिंगो पक्ष्यांचा समुह जणू गुलाबी चादर अंथरल्यासारखा दिसतो. त्यामुळे पक्षीप्रेमीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही दूरच्या शहरांतून फ्लेमिंगो दर्शनासाठी नवी मुंबईत येत असतात. त्यानुसार ’फ्लेमिंगो सिटी’ ही नवी मुंबईची नवी ओळख जपण्याच्या भूमिकेतून फ्लेमिंगोचा अधिवास कायम रहावा यादृष्टीने पर्यावरण प्रेमींमार्फत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेच्या अनुषंगाने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत वन विभागास सूचित करण्यात आलेले आहे.
दरम्यान, याविषयी वन विभागाशी समन्वय ठेवण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून प्रशासन तथा परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.