नवी मुंबई (प्रतिनिधी)- शेगावीचे संत श्री गजानन महाराजांचा 144 वा प्रकटदिन आज बुधवार दि. 23 फेब्रुवारी रोजी आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराजांच्या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्व दिले जाते. यावर्षी गजानन महाराजांच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रकटदिनाची तारीख आणि तिथी ही एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे यावर्षी गजानन महाराजांच्या प्रकटदिनाला विशेष महत्व आहे. अभ्यासकांच्या मते असा योगायोग काही वर्षांपूर्वी जुळून आला आहे. यानिमित्त नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या गजानन महाराज मंदिरांमध्ये कोरोना नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने यानिमित्ताने गण गण गणात बोते मंत्राच्या जयघोषाने नवी मुंबई शहर दुमदुमणार आहे.
आजच्या या प्रकटदिनानिमित्त नवी मुंबईतील वाशी से-29 येथील श्री गजान महाराज मंदिरात तसेच ऐरोली से-2 व 19 व इतर विविध ठिकाणच्या गजानन मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कामोठ्यात संत गजानन महाराज भक्त मंडळातर्फे से-34 वृंदावन पार्क सोसायटी येथे दुपारी 4 ते रात्री 9 यावेळेत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात सायंकाळी साडेसहा वाजता संजय शंकर नारंगीकरण यांचे प्रवचन होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश अढाव व रंजना सडोलीकर यांनी केले आहे. ऐरोलीतील से-3 येथील विविधा सोसायटीत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.