पनवेल (वार्ताहर) - पनवेल-गोरखपूर ट्रेन मधून पर्स खेचून पळून जाणार्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. विशाल यादव (वय 25 वर्षे) असे याप्रकरणी पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पर्स आणि चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षक रेणु पटेल, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय गोरे, हवालदार विशाल कवले, शिपाई एस एन सैनी हे पनवेल स्टेशन वरील फलाट क्रं.7 वर गोरखपूर ट्रेनची तपासणी करत होते. त्याचवेळी कोच नंबर 3 डी मधून चोर..चोर, पकडा पकडा असा जोराचा आवाज आल्याने त्यांनी तिकडे धाव घेतली असता, एक व्यक्ती पळत असताना दिसली. आरपीएफ पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास रोहा -दिवा गाडीत चढत असतांना पकडले. चौकशीत त्याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर कामोठे येथील जाफर इम्रान फक्रुल हसन या व्यक्तीचा आरोपीस फोन आला. त्याला बोलवून घेण्यात आले. त्याच वेळी संतोष रामेश्वर प्रसाद , रा. करंजाडे तेथे आले . त्यांनी आपली पर्स गोरखपूर ट्रेन कोच नंबर 3 डी मधून खेचून नेल्याची तक्रार केली. त्यानी तेथे असलेल्या आरोपीला ओळखले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.