सततच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे!

 


पनवेल (वार्ताहर) - ओवळे गावाच्या हद्दीत गावाच्या बाजूलाच असलेल्या डोंगरावर मोठया प्रमाणात ब्लास्टिंग घेतले जात असल्याने लगतच्या ओवळे, कुंडेवहाळ गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. सततच्या या ब्लास्टिंगच्या प्रकारामुळे रहिवाशांच्या घरांचे नूकसान होत असल्याने त्यांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली असून सिडकोने ब्लास्टिंगचे काम थांबवावे किंवा तीव्रता कमी करावी अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे. दरम्यान, सदरची ही मागणी मान्य न झाल्यास,सिडको विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा ओवळे, कुंडेवहाळ ग्रामस्थांकडून तसेच लोकनेते दि.बा.पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विमानतळ बाधितांच्या पुनर्वसनासाठी अतिरिक्त जागेसाठी ओवळे, कुंडेवहाळ या गावाच्या बाजूलाच मोठमोठ्या डोंगराचे उत्खनन आणि सपाटीकरणाचे काम सुरू आहे. डोंगर उत्खननाकरीता गेल्या काही दिवसापासून मोठया प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. माईन्स अ‍ॅक्टनुसार संबधीताला काम करण्यास शासकिय यंत्रणाकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्या अटी आणि शर्तीचा भंग ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. रस्ते, लोहमार्ग, त्याचबरोबर शैक्षणिक संकुल आणि घरांजवळ खोदकाम किंवा सुरूंग घेता येत नाही. त्याकरीता किमान दोनशे मीटर अंतराची मर्यादा आहे. परंतु बाजूला घरे तसेच उरण  महामार्ग, असतांना ओवळे गावाला लागूनच असलेल्या डोंगरावर डोंगर सपाटीकरणासाठी मोठयामोठया तीव्रतेचे ब्लास्टिंगचे काम सध्या जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे सततच्या या ब्लास्टिंगच्या विरोधात ओवळे व कुंडेवहाळ, डुंगी, पारगाव येथील रहिवासी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. याबाबत लोकनेते दि.बा.पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या माध्यमातून सिडको तसेच पोलीस प्रशासनाला लेखी पत्र दिले असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा सिडकोच्या विरोधात जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी कृती समितीकडून देण्यात आला असल्याचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी बोलताना सांगितले. सदरचे हे काम बंद करा अशी आमची मागणी नसून या ब्लास्टिंग मुळे घराला तडे जातात त्यामुळे हे ब्लास्टिंग बंद करा किंवा त्याची तीव्रता कमी करावा अशी मागणी ओवळेगावचे सरपंच अमित मुंगाजी व उपसरपंच दयानंद म्हात्रे यांनी याविषयी बोलतांना केली.