वाशीतील गुलमोहर सोसायटीमधील रहिवाशांचे पाणी कनेक्शन कापले

 


वाशी (प्रतिनिधी) - वाशी से-9 मधील धोकादायक ठरविण्यात आलेल्या गुलमोहर सोसायटीचा पाणी पुरवठा महापालिकेच्या पथकाने गुरुवारी खंडित केला. महापालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आक्रमकता दाखवित चक्क वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांना त्यांच्या गाडीमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. सायंकाळी उशीरा पोलिसांनी विभाग अधिकारी येडवे यांची सुटका केली.

वाशीतील धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाला सध्या सुरुवात झाली असून येथील गुलमोहर सोसायटीमधील रहिवाशांना मात्र बिल्डर व स्थानिक नगरसेवक यांच्याकडून फसवणूकीची भीती वाटत आहे. कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय आम्ही घरे खाली करणार नाही अशी ठाम भूमिका याठिकाणच्या रहिवाशांनी घेतली आहे. त्यातच गुरुवारी या रहिवाशांचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यासाठी महापालिका व एमएसईबीचे पथक सदरठिकाणी गेले होते. यावेळी पोलिस संरक्षणात पालिकेने पाण्याचे कनेक्शन बंद केल्याने येथील रहिवाशांचा संतापाचा पारा अनावर होवून त्यांनी थेट तेथे असलेले विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांना त्यांच्या वाहनात कोेंडून ठेवण्याचा प्रकार केला. महापालिकेने केलेल्या या कारवाईबाबत आपल्या भावना व्यक्त करतांना येथील संतप्त महिलांनी सांगितले की, आमची दिशाभूल करून कारवाई केली जात आहे. आम्हाला कारवाईची नोटीस दाखवा. मात्र तीही अधिकार्‍यांनी दाखविली नाही. जोपर्यंत कायदेशीर नोटीस दाखवत नाही तोपर्यंत अधिकार्‍यांना सोडणार नाही अशी भूमिका यावेळी संतप्त महिलांनी घेतली होती.