विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेना निवडणूका लढवत असते

 



नवी मुंबई (प्रतिनिधी)- विकासाचा अजेंड घेवून शिवसेना निवडणूका लढवत असते. शिवसेना वचनाला जागते व लोकंाचे प्रश्‍न सोडविते असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल तुर्भे येथे केले. शिवसेना तुर्भे विभागातर्फे शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी व युवानेते महेश कुलकर्णी यांच्यावतीने काल तुर्भे स्टोअर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 

ना. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला. त्याचाच परिणाम म्हणून आजमितीस जिल्हयात अनेक महापालिका,नगरपंचायती, ग्राम पंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. विकासाचा अजेंड घेवून शिवसेना निवडणूका लढवत असते. वचननामा प्रसिध्द केल्यानंतर पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर 90 टक्के किंंबहूना 100 टक्के काम पूर्ण करते. ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता गेली 25 वर्षे सातत्याने आहे. धर्मवीर आनंद दिंघे यांनी लावलेला भगवा झेंडा उतरविण्याची हिमत कुणाची नाही. व हेाणारही नाही असेही ते म्हणाले. नवी मुंबईतही महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने असलेली महिला भगिनींची संख्या पाहून ना. एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजक सुरेश कुलकर्णी यांंचे यावेळी विशेष अभिनंदन केले. ज्यांच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात महिला शक्ती असते त्यांचा विजय निश्‍चित असतो असे प्रतिपादन करत त्यांनी सुरेश कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव यावेळी केला. 10 वार्ड आपले आरक्षीत झाले आहेत. मागील अनेक वर्षापासून कुलकर्णी लोकांची सेवा करतात. हे सर्व लोक प्रेमापोटी व त्यांनीे केलेल्या कामाची पोचपावती देण्यासाठी आले आहेत. शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्ष नवी मुंबईत ज्यांची संत्ता होती त्या लोकांनी नवी मुंबईला काय दिले याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. 

कोविड संपला नाही. कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या योग्य नियोजनाचे कौतूक सर्वांनी केले असून त्याचे अनुकरण सर्वत्र केले जात आहे.  या काळात सर्व सुविधा उपलब्ध केल्या. आवक कमी व जावक जास्त असतांना सरकारने विकासाला कात्री लावली नाही. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून या मार्गामुळे प्रवास सुखकर होईल.कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी कोस्टल हायवे पूर्ण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडलेल्या समस्या मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. उड्डाणपुल बाबत तातडीने कामे पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांना सुचना केल्या आहेत. गरजेपोटी घरांचा विषय व झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 

प्रास्ताविक करतांना सुरेश कुलकणी यांनी सांगितले की, प्रभागातील  जी कामे असतील ती पूर्ण केली आहेत. मात्र ठाणे बेलापूर रोडवरील तुर्भे स्टोअर्स येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून नागरिकांना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. तीन वर्षात मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून अनेकांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी पुढाकार घ्यावा तसेच माता बाल संगोपन केंद्र बांधण्याचे काम 10 वर्षापासून रखडले असून महिलांची केंद्राअभावी मोठी गैरसोय होतांना दिसत असून ही समस्याही मार्गी लावावी अशी मागणी केली. 

खा. राजन विचारे म्हणाले की, कुलकर्णी यांचे कार्यक्रम भव्य दिव्य असतात. त्यांच्या माध्यमातून प्रभागात विविध कामे मार्गी लागली आहेत.महाविकास आघाडीचा भगवा झेंडा नवी मुंबईवर लागेल असा विश्‍वास व्यक्त केला. तर शिवसेना उपनेते विजय नाहटा म्हणाले की,विरेाधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जे पूर्वी पालकमंत्री होते ते पूर्वी कुठे दिसत नव्हते.मात्र आज गल्लीबोलात ते लोकांना भेटतांना दिसत आहे. अशी टिका त्यांनी आ. गणेश नाईक यांचे नाव न घेता यावेळी केली. आजमितीस झालेली प्रभाग रचना ही नियमानुसार व कायदेशीर असून ते दिल्लीपर्यंत गेले तरी काही फरक पडणार नाही. दिघ्यापर्यंत शिवाजी नगरपर्यत एकही भाजप उमेदवार निवडून येणार नाही. अशी खात्री पालकमंत्र्यांना दिली आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह शहरप्रमुख विजय माने, महिला आघाडी वैशाली घोरपडे, सुरेखा गव्हाणे,संगीता वास्के, शिवराम पाटील,  महिला दक्षता पथकाच्या प्रमुख व सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद भोसले, एम. के. मढवी, राजु शिंदे, करण मढवी, ममित चौगुले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.