बेकायदेशीर बाईक रेपिडो व्यवसायामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- कोरोना महामारी तसेच खुल्या करण्यात आलेल्या रिक्षा परमिटमुळे रिक्षांची वाढलेली संख्या यामुळे आधीच रिक्षा चालकांचा व्यवसाय अडचणीत आलेला असतांनाच, मुंबईसह नवी मुंबई परिसरात सध्या सर्रासपणे बेकायदेशीरपणे बाईक राईडर ऑनलाईन बुकिंग करून बाईक रेपिडो व्यवसायाच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रिक्षा चालकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येवून त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता, बेकायदेशीरपणे होणार्‍या बाईक रेपिडो व्यवसाय करणार्‍यांवर आरटीओने कारवाई करावी अशी मागणी नवी मुंबईतील रिक्षा संघटनांसह रिक्षाचालकांकडून केली जात आहे.

नवी मुंबई परिसरात सध्या हा व्यवसाय बोकाळला आहे. अनेक बाईक रेपिडो पकडून त्यांना रिक्षा चालकांनी समज दिली आहे. सध्या रिक्षा परमिट खुले करण्यात आल्यामुळे रिक्षांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसाय कमी झाला असून, गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत सापडून आम्हावर उपासमारीची वेळ आली असल्याचे रिक्षाचालक सांगतात. रिक्षा व्यवसाय कसेबसे आम्ही आमच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करत असतो. मात्र त्यात आता बेकायदेशीर बाईक रायडर व्यवसाय वाढीस लागला असल्याने आमच्या व्यवसाय अजून अडचणीत सापडला आहे. या बाईक रायडर्सना कुठल्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नाही. मात्र तरीसुध्दा त्यांच्याकडून हा व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे. याबाबत सबंधित यंत्रणेचेही दुर्लक्ष झाले आहे. या प्रकारासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून लवकरात लवकर या बेकायदेशीर व्यवसायावर आरटीओने कारवाई करावी, अन्यथा रिक्षाचालक कठोर भूमिका घेतील अशा संतप्त भावना यासंदर्भात बोलतांना असंख्य रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत.