अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा अटकेत!

 

पनवेल (प्रतिनिधी) - एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुवाहाटी आसाम येथे पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या इसमाला पनवेल तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.

तालुक्यातील हावरे बिल्डिंग, पडघे, पनवेल, येथून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने  कौशल्याने तपास करण्यास सुरवात केली. त्याअंतर्गत अपहृत मुलीचे मोबाईलचे सीडीआर प्राप्त करून त्याचे अवलोकन केले असता, एक इसम अपहृत मुलीस सतत कॉल करीत असल्याचे निर्दशनास आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार तात्काळ 2 पोलिस पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला रेल्वे स्टेशन, मुंबई.-कल्याण रेल्वे जंक्शन,कल्याण,ठाणे- पनवेल रेल्वे स्टेशन,पनवेल येथे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासह मोबाइलचे सीडीआर व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला .यानंतर यातील संशयित आरोपीचे सीडीआर प्राप्त झाल्यानंतर त्याचा व अपह्त मुलीचा मोबाईल सीडीआर एकत्रित करून तांत्रिक तपास केला असता, त्यामध्ये एकच व्यक्ती गुन्ह्याचे दिवशी मुलीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदर इसमास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, त्याचे नाव सजीप बरदोलाई (22) रा.गुवाहाटी आसाम असे असल्याचे उघड होवून त्याने  अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला तोंडरे, तळोजा, पनवेल येथे लपवून ठेवले असल्याचे व उद्या दोघेही गुवाहाटी,आसाम येथे जाणार होतो असे पोलिसांसमोर कबूल केले. त्यानुसार सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करून अपहृत मुलीची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्याने तिच्या कुटूंबियांनी पनवेल तालुका पोलिसांचे आभार मानले आहेत.