युवासेनेच्या प्रयत्नांना यश! विद्यार्थीनीची फी कमी करण्यासह परिक्षेला बसण्यास शाळेची अनुमती!

 पनवेल (वार्ताहर) - नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणार्‍या गुंजन नावाच्या विद्यार्थिनीला गेल्या 7-8 महिन्यापासून शाळा फी साठी त्रास देत होती. याबाबतची तक्रार पालकांनी युवा सेनेकडे करताच युवा सेनेच्या प्रयत्नाने सदर विद्यार्थीनीची शाळेने फी तातडीने कमी करुन तिला परिक्षेस बसण्यास अनुमती दिली आहे.

गुंजनचे वडील नसल्याने तिची घरी हलाकीची परिस्थिती आहे, आई आणि मामा यांच्याकडून घर चालत असतांना ह्याच शाळेत घरातील 2 मुले शिकत आहेत, तिने सुरुवातीची फी दिलेली असतांना उर्वरित फी मध्ये शाळेने आई एकटी कमावते म्हणून फी मध्ये सवलत देण्याचे वचन दिले होते. मात्र तसे न होता शाळेने तिला सरसकट सर्व फी भरण्यास तसेच फी भरली नाही तर दहावीच्या टेस्ट परीक्षेत बसता येणार नसल्याचे शाळेच्या प्रिन्सपल यांनी सांगितले. याबाबत खूप विनवणी केल्यानंतर ही शाळा जुमानत नसल्याने शेवटी तिच्या घरच्यांनी युवासेना प्रमुख, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना थेट ईमेल करून याबाबतची  तक्रार केली. यानंतर तातडीने सदर आदेश रायगड व नवीमुंबई येथील काम पाहणारे युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील यांना युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या मार्फत आले असतांना तातडीने पालकांना भेटून सर्व प्रकार रुपेश पाटील यांनी जाणून घेतला व ह्या बाबत थेट रायन ग्रुपच्या हेड आलीस यांना विचारण करत याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच शाळेने पालकांना बोलावून गंुंजन हिच्या परीक्षेचा फॉर्म भरून दिला व फी बाबत सवलत देण्याची युवासेनेची मागणी मान्य केली. दरम्यान, युवासेनाप्रमुख व ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे फलित म्हणून गुंजन हिची मागील काही होत असलेल्या या त्रासातून सुटका होवून तिला  न्याय मिळाल्याने या बाबत तिच्या घरच्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे व इतर पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कोविड नंतर अशा प्रकारच्या त्रासातून अनेकांना  जावे लागत आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज किंवा इतर ठिकाणी अशा स्वरुपाचा त्रास होत असेल तर संबंधितांनी तातडीने रुपेश पाटील यांना संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.