वाशी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केलेल्या प्रयत्नांमुळे एपीएमसी मार्केट फ्रुट मार्केट गेट समोरील फ्रुट मार्केट ते भाजी मार्केट रोडच्या कडेला लावण्यात आलेली पत्र्याची शेड महापालिकेकने हटविली असल्याने पोलिसांना व रस्त्यावर चालणार्या नागरिकांना होणार्या त्रासातून मुक्तता झाली असल्याने स्थानिक रहिवाशांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
एपीएमसी मार्केट फ्रुट मार्केट गेट समोरील फ्रुट मार्केट ते भाजी मार्केट रोडच्या कडेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांनी व्यवसाय करू नये यासाठी पत्र्याची शेड लावण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचक्रोशी चौकातील आरटीओ चौकी लगतच फ्रुट मार्केट चौक ते भाजी मार्केट शेड बांधण्यात आली असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे, याशिवाय अॅम्बुलन्स जाण्यासाठी तसेच वाहतूक पोलीसांना काम करताना अडचण होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आशयाचे पत्र एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल अहिरे यांनी नवी मुंबई महापालिकेस सादर करून या अडचणी दूर करण्याची विनंती केली होती. परंतु महापालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने ही समस्या जैसे थे होती. यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांच्या आदेशानुसार नवी मुंबई कार्यकारणीच्या शिष्टमंडळाच्या वतीनेही नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे ’डी’ विभाग कार्यालयास यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने या निवेदनाची दखल घेत, रस्त्याच्या कडेला लावलेली पत्र्याची शेड अखेर काढून टाकण्यात आली आहे. या शिष्टमंडळात नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे, महिला शहराध्यक्ष नवी मुंबई रुचिका करपे, शहर उपाध्यक्ष उमेश पाटील, शहर सचिव प्रदीप कणसे, युवक शहराध्यक्ष गौरव धाये, युवक शहर सचिव विवेक पाटसकर, युवक संपर्कप्रमुख अनंतराज गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता.