नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे नवी मुंबई व रायगडमध्ये क्रिकेट स्पर्धां आयोजनामध्ये वाढ झाली असून शहरातील लहान मोठी मंडळे डे -नाईट क्रिकेट स्पर्धा भरवीत आहेत. आरोग्य क्षेत्रातील एका आकडेवारीनुसार 2020- 21 मध्ये महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 तरुणांचा क्रिकेट मैदानावर मृत्यू झाला आहे, त्यामुळे तरुणांनी क्रिकेट खेळताना सावधानता बाळगणे जरुरी आहे. क्रिकेट अथवा इतर कोणतेही स्पर्धात्मक खेळ खेळतांना वैद्यकीय प्रशिक्षक अथवा निरीक्षक असणे जरुरी असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना कामोठे येथील क्रिटीकेयर लाइफलाईन हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे म्हणाले, आपण सर्वजणच कोरोनाच्या महामारीतून सावरत आहोत, गेली दोन वर्षे आपण घरामध्ये अडकून राहिलो होतो तर अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तरुणांचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे कोरोना झालेल्या नागरिकांनी किमान वर्षभर तरी काळजी घेतली पाहिजे. आजमितीला मुंबईसह नवी मुंबई, रायगड ठाणे पालघर या लगतच्या शहरांमध्ये क्रिकेटस्पर्धांमध्ये 18 वर्षांपासून ते पन्नाशी पार केलेल्या नागरिकांचा यात थेट सहभाग असतो . खेळत असताना शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येणे , पडल्यामुळे दुखापत होणे तसेच उच्च रक्तदाब वाढल्यामुळे भोवळ येणे असे प्रकार मैदानात होत असतात, अशावेळी तात्काळ उपचार करणे फार गरजेचे असते.
अनेकवेळा चक्कर आल्यावर त्या खेळाडूला सावलीत बसविले जाते अथवा तंबूमध्ये आराम करण्यास सांगितले जाते परंतु असे करणे चुकीचे आहे. तिशीच्या तरुणांमध्ये हृदयविकार वाढत असून त्यामागची कारणे ही आजच्या विसंगत जीवनशैलीमध्ये सापडतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह व उच्च रक्तदाब चोर पावलांनी शरीरात शिरल्यावर हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो. जेंव्हा मैदानात खेळ सुरु असताना तेथील स्पर्धेच्या वातावरणामुळे शरीरातील रक्तदाब हा वाढलेला असतो अशा वेळी ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या खेळाडूचे हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात अशावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे असते असे त्यांनी सांगितले. सततचा मानसिक ताणतणाव, बिघडलेली आर्थिक गणिते, नात्यांमधील दुरावा व सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहता भविष्यात हृद्यविकार वाढण्याची शक्यता असून रोजच्या जीवनशैलीमध्ये तत्काळ बदल करणे गरजेचे आहे असे मतही हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे यांनी व्यक्त केले.