नवी मुंबई (प्रतिनिधी)- सध्या मुबलक पाण्यामुळे नवी मुंबईकरांनी चारचाकी वाहन धुण्यासाठी बिनधास्तपणे पिण्याच्या पाण्याचा मारा सुरू केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात किंवा पाण्याचे शटडाऊन असल्यावर तहान भागविण्यासाठी महापालिकेसह विविध सामाजिक संस्थांही सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पाण्याच्या बचतीचा जागर सुरू करतांना दिसतात. मात्र, मुबलकतेमुळे नवी मुंबईकरांची पाण्याबाबतची बेफिकिरी सध्या चांगलीच वाढल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणात पाणी साठा कमी झाल्यावर किंवा काहीवेळा पाणीपुरवठ्याबाबत करावयाच्या कामानिमित्त पाण्याचे शटडाऊन घेतल्यावर महापालिकेतर्फे नागरिकांना पाणी बचतीचा संदेश दिला जातो. व त्यानुसार येथील नागरिकांकडून महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला जातो. मात्र सध्या पाणी बचतीचा काहींना विसर पडल्याचे शहराच्या विविध भागांत वाहने धुण्यांच्या सुरु असलेल्या प्रकारातून दिसून येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईत पाण्याच्या होणार्या या गैर वापराबाबत काही जागरूक नागरिकांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त करतांना सांगितले की, वाहन स्वच्छ असावे, यात काहीही गैर नाही. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्याऐवजी एखाद्या बादलीत पाणी घेऊन कापडाने वाहन स्वच्छ करणे शक्य आहे. अशा पद्धतीने अवघ्या दोन किंवा तीन बादल्यात वाहन धुता येईल. नागरिकांनी स्वतःच पाणी बचत गांभीर्यानी घेतली तर वाहनही स्वच्छ होईल अन् पाण्याची बचतही होईल.