पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेने लावलेला जिझिया मालमत्ता कर रद्द करावा, अन्यथा त्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा अॅड सुरेश ठाकूर यांनी पालिका प्रशासनास दिला आहे.
काल पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराच्या विरोधात अॅड सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंंडळाने पनवेल महापालिका उपायुक्तांबरोबर चर्चा केली. मालमत्ता कर रद्द करावा नाहीतर सदर कर सिडकोकडून वसूल करावा. मनपाचे लावलेले कराचे दर हे क वर्ग महापालिकांचे असून ते चुकीचे आहेत तसेच भूमिपुत्रांना व इतर नागरिकांना गृहनिर्माण संस्थांना सिडको मार्फत वाटपित भुखंड साठ वर्षे भाडे तत्वावर आधारित असून त्याची मालकी ही सिडकोकडे असल्याने त्या इमारतींचा कर हा सिडकोकडून वसूल करावा, मालमत्ताकराविरोधात पालिकेस निवेदन सादर करून लवकरच खारघर ते पनवेल लाँग मार्चचे आयोजन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या शिष्टमंडळात अॅड विजय गडगे, नीलकंठ पाटील, संतोष गायकर, रमाकांत पाटील, श्याम पाटील, मेघनाथ पाटील, विश्वनाथ चौधरी, विनोद लाड आदि मान्यवर उपस्थित होते.