नवी मुंबई (प्रतिनिधी) - सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांनी चांगली झेप घेतली आहे. आज गुजरातकडे देशाचे नेतृत्व आहे, मात्र दुर्देवाने देशाची सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणार्या रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा चमत्कारीक आहे. रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्राबद्दल घेतलेले निर्णय हे चिंताजनक वाटावे असे आहे, अशी खंत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष तथा माजी के्रंदीय मंत्री शरद पवार यांनी काल नवी मुंबई मध्ये व्यक्त केली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, सहकार चळवळीमध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक वेगळा आहे. सहकार खात्याचा कारभार मी जवळून बघितला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्याचा कारभार हा चांगला आहे. खर्या अर्थाने महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा पाया मजबुत करण्याचे काम हे यशवंतराव चव्हाण यांनी केले असल्याचे पवार म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे सध्या सहकार क्षेत्रामध्ये चिंता वाटावे असे कारण आहे. याबद्दल संसदेमध्ये देखील चर्चा झालेली आहे. पण प्रश्न मार्गी लागत नाही. म्हणून बँका व पंतसंस्थाचे प्रश्न काढून त्यांची नोट बनवण्याचा सल्ला सहकारी पंतसंस्था फेडरशेना ला दिला. तर सध्या गुजरात कडे सहकार व पंतप्रधानपद असल्यामुळे त्याच्याकडे जाऊन आपण प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. यावेळी पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, पंतसंस्थांचे मोठ्या बँकांमध्ये पैसे अडकतात ही वास्तव परिस्थिती आहे. त्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सहकार विभागाकडून करण्यात येत आहे. पंतसंस्था फेडरेशनच्या माध्यामातून या सहकाराला चालना देण्याचे तसेच गतिमान करण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडेरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी तीनशे पतपेढयाचे 800 कोटी रुपये पंजाब महाराष्ट्र बॅकेत अडकल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेने या बँकेचे खाजगी बॅकेमध्ये विलगीकरण केले आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेविरोधात पंतसंस्था आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील कोयटे यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक अनिल कवडे तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी सहकाराला तरूणांची साथ लाभावी, अधिकाधिक तरूण वर्ग सहकाराकडे आकर्षित व्हावा म्हणून तंत्रज्ञानाभिमुख सेवांचा अधिकाधिक वापर संस्थेने करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख मान्यवरांच्याहस्ते प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटनप्रसंगी शिवम पे या अॅपचा झालेला शुभारंभ हे असल्याचे ते म्हणाले. या मोबाईल अॅपव्दारे संस्थेचे सभासद शिवकृपा व इतर बँकांमध्ये घरबसल्या व्यवहार करू शकणार आहेत. प्रबळ विश्वासार्हता ग्राहकांमध्ये वाढविणे हा आमचा हेतु असल्याचे त्यांनी यावेळी संागितले.
संस्थेचे उपाध्यक्ष वसंत चव्हाण यांनी माहिती देतांना सांगितले की, तब्बल 3 लाख 52 हजार सभासद संख्या असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढीला सतत ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे. ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारी ही संस्था ग्राहकांना घरपोच सेवा देते. दर आठवड्याला सुमारे 14 कोटी रूपयांची कर्जे संस्थेकडून मंजूर करण्यात येतात. चाळीस वर्षाची ही उज्वल परंपरा असणार्या शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या मुख्यालयाची इमारत एक हजार चौरस मीटर जागेवर बांधण्यात आलेली आहे. तळमजला अधिक सहा मजल्यांचा समावेश असणार्या इमारतीत अत्याधुनिक सेवासुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
1982 मध्ये मुंबईत विक्रोळी येथे शिवकृपा सहकारी पतपेढीची स्थापना झाली होती. संस्थेचे एक प्रशासकीय कार्यालय विक्रोळी , गोरेगाव, ठाणे, पुणे, सातारा, कोरेगाव आणि माळशिरस याठिकाणी 7 विभागीय कार्यालये आणि राज्यभरात पसरलेल्या तब्बल 100 शाखा आहेत. त्यापैकी 41 जागा संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. पुणे व सातारा येथील विभागीय कार्यालये प्रशासकीय कार्यालयाशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जोडण्यात आलेली असून त्याचा वापर बैठका, मुलाखती आणि प्रशिक्षणासाठी करण्यात येतो. संस्थेत एकूण 750 कर्मचारी कार्यरत असून त्यात 105 विशेष वसुली अधिकार्यांचा समावेश आहे.