उरण द्रोणागिरी नोडमधील बिल्डरलॉबीचा मजुरांच्या जीवाशी खेळ!

 

उरण (वार्ताहर) - सिडकोच्या माध्यमातून उरणमध्ये द्रोणागिरी नोडची उभारणी सुरू आहे. बिल्डरलॉबी कडून इमारतींचे जाळे विणले जात आहे. मात्र ज्या मजुरांच्या जीवावर इमारतींचे हे जाळे उभारले जात आहे. त्या कामगारांच्या सुरक्षेसाठी बिल्डर्सकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षाविषयक उपकरणे पुरविली जात नसल्याने या बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विकासकांकडून मजुरांना त्यांच्या सुरक्षेसाठी लागणारी उपकरणे व साहित्य पुरविण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याने आजमितीस असंख्य मजुरांना आपल्या जीवावर उदार होऊन काम करावे लागत असल्याचे चित्र द्रोणागिरी नोड परिसरात पहावयास मिळत आहे. याबाबत बिल्डरांच्या कर्मचारी वर्गाकडे विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यात नजीक नवी मुंबई विमानतळ, उरणला रेल्वे येणार असल्याने सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची उभारणी सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी सदनिका घेण्यासाठी जनतेचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिल्डरांच्या कार्यालयात बुकिंग जोरात सुरू आहे. भविष्यात तिसरी मुबंई उभी रहाणार आहे. मात्र इमारतींचे जाळे विणले जात असताना कामगारांच्या सुरक्षिततेबाबत होणार्‍या या निष्काळजीपणाबाबत प्रशासकीय अधिकारी वर्गाचे नियंत्रण नसल्यानेच बिल्डर लॉबी नियमांची पायमल्ली करीत आहेत. यावरून प्रशासन यंत्रणेचे संबंधितांशी आर्थिक हितसंबंध असल्यानेच कारवाई करण्याबाबत कुचराईपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे.        

द्रोणागिरी नोडमध्ये बिल्डर 10 ते 15 मजली इमारती उभ्या करीत असताना कामगारांना सेफ्टी म्हणून साधा कंबरेला दोर बांधून उंच ठिकाणी काम करावे लागत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. यामुळे कामगारांच्या  जीवावर मालामाल होणार्‍या बिल्डरलॉबीचे झालेल्या या दुर्लक्षामुळे बांधकाम कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, प्रशासकीय यंत्रणेने कामगारांच्या जीवाशी खेळणार्‍या बिल्डर लॉबीची सखोलपणे चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.