रायगड (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर करून तयार केलेली तुतारी एक्सप्रेस काल रायगड जिल्हयातील पनवेल, माणगाव, वीर रेल्वे स्थानकात राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली.
राज्य सरकारकडून दादर-सावंतवाडी (तुतारी एक्स्प्रेस) ह्या गाडीची यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांचा उल्लेख रेल्वेवर करण्यात आला आहे. तुतारी एक्स्प्रेस रात्रौ 1.10 वाजता पनवेल, 3.18 वाजता माणगाव, 3.35 वाजता वीर रेल्वेस्थानक येथे दाखल झाली. लोकहिताच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. यावर्षी प्रथमच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मिरज मार्गे धावणारी कोल्हापूर-मुंबई कोयना व कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा समावेश आहे. ’आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ ही टॅग लाईन घेऊन शेती, क्रीडा,सामाजिक न्याय, आरोग्य, मोफत सातबारा, ई पीक पाहणी, यासह विविध लोकापयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश रेल्वे गाडयांच्या डब्यांवर अंकित करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी दि.1 फेब्रुवारी 2022 ते दि.01 मार्च 2022 दरम्यान एक महिना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.