खारघर (प्रतिनिधी)-खारघर येथील डीमार्टच्या जवळील नागरी प्राथमिक आरोग्यर्धिनी केंद्रात कोविड साथरोग आटोक्यात आल्याने बाह्यरूग्ण सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तसेच विविध वैद्यकिय सेवांचे उद्घाटन काल महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख ,नगरसेवक निलेश बावीस्कर प्रभाग अ’च्या सभापती संजना कदम, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर नगरसेविका नेत्रा पाटील, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्याहस्ते करण्यात आले.
या प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये कोविड साथरोगाची रूग्ण संख्या कमी झाली असल्याने बाह्यरूग्ण सेवा पुर्ववत करण्यात आल्या आहे. यामध्ये ओपीडी अंतर्गत डॉक्टर, विशेष तज्ञांकडून सल्ला, प्रसूतीपूर्व सेवांतर्गत दर बुधवारी गरोदर मातांची तपासणी, प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन,किरकोळ रेागांची बाह्य रूग्ण सेवा, टी.बी. कुष्ठरोग, यासारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध नियंत्रण व नियोजन, नवजात अर्भक व नवजात शिशूंसाठी आरोग्य सेवा, लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा या अंतर्गत बाल्यावस्था व किशोरवयीन सेवा, कुटूंब नियोजन गर्भनिरोधक व प्रजनन संबधी इतर आरोग्य् सेवा, मानसिक आरोग्य तपासणी, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार , टिळक विद्यापीठाच्या डॉक्टरांच्या माध्यामातून फिजोथेरपी दिली जाणार आहे तसेच लॅब टेस्ट यामध्ये कंप्लिट ब्लड काऊंट, रक्तातील साखर, थायरॉईड , मलेरिया, डेंगू, एचआयव्ही, लिव्हर-किडनी फंक्शन या टेस्ट केल्या जात आहे. यासह आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन विविध सर्वेक्षण करतेवेळी नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. यावेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी, टिळक विद्यापीठाचे फिजीओथेरपी डॉक्टरर्स, परिचारिका, आशा वर्करस्, नागरिक उपस्थित होते.