नवी मुंबई (प्रतिनिधी) नेरुळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात व्हिएतनामने एएफसी वुमन्स आशिया कप हिंदुस्थान 2022 स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत चिनी तैपईचे कडवे आव्हान 2-1 गोलने परतवले.
या विजयासह व्हिएतनामने 2023 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमान पदाखाली होणार्या फिफा विश्वचषक स्पधेचे तिकीट मिळवले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिएतनामने पात्रता मिळवली असल्याने त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली.
चेउंग थियू कियूने सातव्या आणि एनग्युयेन थी बिच थूय हिने 56व्या मिनिटाला गोल करत व्हिएतनामच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. चिनी तैपईकडून एकमेव गोल हेई सुआनने दुसर्या सत्रात केला. या पराभवानंतर चिनी तैपई संघ आता इंटर-कॉन्फेडरनेश प्ले ऑफ लढतीत थायलंडविरुद्ध खेळेल. या लढतीत विजय मिळवल्यास 31 वर्षांत पहिल्यांदाच चिनी तैपई संघ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेची पात्रता गाठेल. शुक्रवारी थायलंडला 3-0 गोलने नमविलेल्या चिनी तैपईला विश्वचषक पात्रता मिळवण्यासाठी व्हिएतानामविरुद्ध केवळ बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. परंतु व्हिएतनामने आक्रमक सुरुवात करत चिनी तैपईला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले.
पहिल्या गोलनंतर व्हिएतनामच्या संघात उत्साह संचारला आणि त्यांनी 19 व्या मिनिटालाही गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र चेन - पिंगने व्हिएतनामचे आक्रमण रोखले. यानंतर पहिल्या सत्रात कोणालाही गोल करता आला नाही. चिनी तैपईने दुसऱया सत्रात शानदार खेळ करताना गोल केला . 49 व्या मिनिटाला सू हेई सुआनने डाव्या कॉर्नरने गोल करत चिनी तैपईला 1-1 गोल बरोबरी साधून दिली. या वेळी चिनी तैपईने सामन्यावर चांगले नियंत्रण मिळवले. परंतु 56 व्या मिनिटाला एनग्युयेन थी बिच थूय हिने शानदार गोल करत व्हिएतनामला 2-1 गोल असे आघाडीवर नेले. व्हिएतनामने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करत अखेरपर्यंत आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला. या निर्णायक गोलच्या जोरावर व्हिएतनामने फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवली.