पनवेल मनपा क्षेत्रातील बेशिस्त नागरिकांवर क्लीनअप मार्शलचा बडगा!

 


पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परिसर स्वच्छते बरोबरच मास्क न वापरणार्‍या बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरात क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आलेली असून या मार्शलनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या शहरातील बेशिस्तांना दंडात्मक कारवाईचा दणका देण्यास सुरुवातही केली आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात बेशिस्त नागरिकांकडून आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुपयांच्या वरती दंड वसूल करण्यात आला आहे.दरम्यान, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवाईचे शिस्तप्रिय नागरिकांनी स्वागत केले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत उल्लंघन केल्या जाणार्‍या नियमांबाबत बेशिस्त नागरिकांकडून आकारली जाणारी दंडात्मक रक्कम पुढील प्रमाणे आहे- रस्ते व मार्गावर घाण करणे - 150 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे 100 रुपये दंड, उघड्यावर शौच करणे 500 रुपये दंड, प्लास्टिक बंदीचा पहिला गुन्हा केल्यास 5 हजार रुपये दंड, दुसर्‍यांदा गुन्हा केल्यास दहा हजार रूपये तर तिसर्‍यांदा गुन्हा केल्यास 25 हजार रुपये दंड केला जातो. विलगीकरण न केलेला व विविध डब्यामध्ये साठवण न केलेला कचरा सोपविल्याबद्दल पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या प्रसंगी अनुक्रमे 50,100 व 150 रुपये दंड, कचरा जाळण्याबाबत आढळल्यास 300 रुपये दंड व सार्वजनिक ठिक़ाणी विनामास्क फिरतांना आढळल्यास पाचशे रूपये दंड वसूल केला जातो. त्यानुसार आतापर्यंत 574 बेजाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात सोशल डिस्टन्स न ठेवल्याप्रकरणी 297 नागरिकांवर, विनामास्क फिरणार्‍या  401 नागरिकांवर, उघड्यावर शौचास बसल्याप्रकरणी 40 नागरिकांवर, बेकायदा प्लास्टिक पिशवीचा वापर एका नागरिकावर, रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी 7 जणांवर तर रस्त्यावर कचरा फेकणार्‍या 3 नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. 

पनवेल स्वच्छ आणि सुंदर ठेवताना रस्त्यांवर कुठेही थुंकणार्‍या ’बहाद्दरां’वर क्लीन-अप मार्शलकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून आता प्रत्येक प्रभागात कंत्राटी पद्धतीने 4 ते 6 क्लीन-अप मार्शल नेमले आहेत. या पद्धतीने सध्या 15 ते 30  क्लीन-अप मार्शल शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळत आहेत. पनवेलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका विविध उपाय करत आहे. त्यामध्ये मास्कचा वापर न करणार्‍यांविरोधात क्लीन-अप मार्शलसह पोलिस, रेल्वे परिसरात कारवाई केली जात आहे. त्यानुसार मास्कचा वापर न करणार्‍याविरोधात 500 रु. दंड आकारला जात आहे. शहर स्वच्छतेसाठी पालिकेने नेमलेल्या या अधिकृत क्लीन-अप मार्शल्सना  पालिकेच्यावतीने विशिष्ट गणवेश दिला असून, त्यांच्याजवळ  दंडाची रक्कम असणारे कार्ड देण्यात आले आहे. कारवाईचे स्वरुप अधिक तीव्र करण्यासाठी पालिकेकडून प्रत्येक विभागांत अतिरिक्त क्लीन-अप मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे, रस्त्यावर थुंकणार्‍या, कचरा फेकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई अजून मोठ्या प्रमाणांत तीव्र केली जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात परिसरात रस्त्यांवर, लोकल-बस प्रवासादरम्यान कुठेही बिनदिक्कत थुंकणार्‍यांची संख्या मोठी आहे. पालिकेच्या नियमानुसार रस्त्यावर घाण केल्यास त्यावर कारवाई केली जाते. तरीही, रस्त्यांवर घाण करणार्‍यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. त्यासाठी त्यांच्यावरील कारवाईचे प्रमाण वाढविणे आवश्यक ठरले आहे. त्यासाठी क्लीन-अप मार्शलची फौज उपयुक्त ठरणार असल्याचे घनकचरा विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

घर व परिसर स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.  काही बेजाबदार नागरिकांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व अशा अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते.आणि त्याच्या परिणाम नागरिकांच्याच आरोग्यावर होत असतो. पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छते विषयी जनजागृती सुद्धा करण्यात येत असते.परंतु आपला परिसर आपले शहर स्वच्छ ठेवणे हि सुद्धा नागरिकांची जबाबदारी असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, मलमूत्र विसर्जित करणे,प्लॅस्टिक बंदी आदींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिका उपविधी तयार करून क्लिन अप’ मार्शल तैनात केले आहेत. प्लॅस्टिक बंदीवरतीही महापालिकेच्यावतीने कठोर कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. मार्केट, रेल्वे परिसर, वर्दळीचे रस्ते, खाडी किनारे, महत्त्वाची व्यावसायिक संकुले तथा औद्योगिक संकुले, फेरीवाले विभाग आदी प्रभागातील वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणीच क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे.