नवीन पनवेल परिसरात अज्ञाताकडून कचरा जाळण्याचा प्रकार; कारवाईची मागणी

 


पनवेल (वार्ताहर) - नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेल मधील स्थानिक रहिवासी करीत आहेत.

नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पाँड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. सदर कचरा हा सिडको व महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जातो व परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. मात्र काही जण हा जमलेला कचरा रात्रीच्या वेळी जाळत असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्यासह दुर्गंधी पसरत असते. कचरा जाळण्यास बंदी असतानाही हा प्रकार केला जातो. त्यामुळे अशा व्यक्तींविरूद्ध संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.