पाणी कपातीचा निर्णय रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपातीचा घेतलेला निर्णय नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आ. गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आ. गणेश नाईक यांनी या संदर्भात 22 फेब्रुवारी 2022 रोजी सडेतोड पत्र लिहिले असून पाणीकपातीचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. मोरबे धरणात पुरेसा पाणीसाठा असताना पाणीकपात कशाला? मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठयाचे नियोजन करण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी मोरबे धरणात 20 सप्टेंबर 2022 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असतांना नागरिकांवर आताच पाणीकपात लादणे अन्यायकारक असल्याचे आ. गणेश नाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत अगोदरच अनियमित आणि असुरळीत पाणीपुरवठयाचा त्रास आहे. त्यात आता एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा पालिका बंद ठेवणार असल्याने नागरिकांच्या हालात अधिकच भर पडणार आहे. तुर्भे, नेरूळ, ऐरोली, घणसोली, बेलापूर, कोपरखैरणे, वाशी इत्यादी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसणार आहे.

एमआयडीसीकडून नवी मुंबई पालिका क्षेत्रात देय पाणीपुरवठा पुर्णपणे होत नाही. दिघा, ऐरोली, घणसोली हे भाग एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावरअवलंबून असल्याने या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. आ. गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर आजवर झालेल्या बैठकांमधून नवी मुंबईकरांना पुरेसे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केलेली आहे. 

दरम्यान एमआयडीसीकडून नवी मुंबईला होणारा पाणीपुरवठा अन्यत्र वळविण्यात येतो आहे. त्यामुळे नवी मुंबईचा पाणीपुरवठा एमआयडीसीने कमी केला आहे. ही बाब आ. नाईक यांनी पालिका प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या एमआयडीसीकडून नवी मुंबईच्या हक्काचे पाणी मिळवून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.