नवी मुंबई (प्रतिनिधी) - व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देणार्या जसप्रीत सिंग सरदारसिंग सोधी (45) या शिक्षकाने कामोठे येथील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. पीडितेची अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होता, असे पोलिस तपासात उघड झाले. दरम्यान, या घटनेत, पीडितेच्या पालकांनी खासगी डॉक्टरकडून प्रसूती करून घेत अर्भकाची विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतरही शिक्षकाने धमकावून तिला गप्प राहण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
2018 मध्ये पीडिता ठाण्यातील एका पुस्तक प्रदर्शनात गेली असताना तिची ओळख आरोपी जसप्रीत सिंगसोबत झाली. मालाड येथे राहणारा जसप्रीत सिंग हा व्यक्तिमत्त्व विकासावर शिकवण्या घेत असल्याने पीडितेच्या घरी त्याची ये- जा सुरु होती. याचदरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांशी त्याची जवळीकता वाढल्याने काही दिवस जसप्रीत याने पीडिता आणि तिच्या भावाला घरी बोलावून घेतले. त्यावेळी तिच्याशी अश्लील चाळे केले. तिचे अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे काढून तिला शरीरसंबंध ठेवण्यास धमकावले. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, 2020 च्या डिसेंबरमध्ये पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने त्याबाबत विचारणा केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार आईसमोर कथन केला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात जसप्रीत सिंगविरोधात न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.