दुसरा डोस जलदगतीने पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर! मायक्रोप्लानींगव्दारे कोव्हीड लसीकरण आपल्या दारी विशेष मोहिम

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नागरिकांचा कोव्हिड लसीकरणाचा दुसरा डोस जलद गतीने पूर्ण करण्याबाबत नवी मुंबई महापालिकेकडून भर दिला जात असून त्यासाठी मायक्रोप्लानींग करीत कोव्हीड लसीकरण आपल्या दारी ही विशेष मोहिम राबविली जात आहे.

कोव्हीड लसीकरणाव्दारे नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सुयोग्य नियोजन करीत 102 इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. तसेच दुसर्‍या डोसचे लसीकरण जलद पूर्ण करण्याकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष देत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने सर्व लाभार्थी नागरिकांचा दुसरा डोस विहित वेळेत पूर्ण व्हावा हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड लसीकरण आपल्या दारी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राला उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलेले आहे. महापालिकेतर्फे राबविण्यात येणार्‍या आयपीपीआय लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर ’कोव्हीड लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेचे सुक्ष्म नियोजन (मायक्रोप्लॅनिंग) करण्यात आले आहे.  या मोहिमेमध्ये 23 नागरी आरोग्य केंद्रनिहाय आशा वर्कर तसेच एएनएम यांचे पथक निर्माण करण्यात आले असून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये अशी 2 ते 3 पथके कार्यरत असणार आहेत. प्रत्येक पथक दररोज 500 ते 600 घरांना भेट देऊन तेथील लसीकरण राहिलेल्या व त्यातूनही विशेषत्वाने दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करणार आहेत. या नागरिकांना त्यांच्या घराजवळच्या लसीकरण केंद्रांवर नेऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. या मोहिमेमध्ये 29 हजार गृहभेटीचे लक्ष्य साध्य करण्यात येणार असून या अनुषंगाने प्रत्येक पथक सर्वेक्षण करेल व लसीकरण पूर्ण करून घेण्यावर भर देणार आहे.

 या मोहिमेच्या प्रचार प्रसारासाठी लसीकरण विषयक आवाहन करणारे घोषवाक्य स्टिकर, लसीकरण कार्ड, बॅनर्स असे विविध प्रचार साहित्य वापरले जात असून कार्यक्षेत्रात ध्वनीक्षेपकाव्दारे (माइकिंग) आवाहन देखील केले जात आहे. अशाचप्रकारे 3 जानेवारी 2022 पासून सुरु केेलेल्या 15 ते 18 वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलामुलींच्या कोव्हॅक्सिन लसीकरणाला 28 दिवस झाले असल्याने लसीकरणाचा दुसरा डोस सुरु करण्यात आलेला आहे. 15 ते 18 वयोगटात 72 हजार 79 मुलांना (98.23%) कोव्हीड लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याप्रमाणेच दुसरा डोसही जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन झाल्यानंतर 84 दिवस झालेल्या नागरिकांनी किंवा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस झाल्यानंतर 28 दिवस होऊन गेलेल्या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा व स्वत:ला लस संरंक्षित करून घ्यावे तसेच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनीही लसीचा दुसरा डोस विहित वेळेत घ्यावे  त्यांच्या पालकांनी त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.