राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त... अंनिसतर्फे चमत्कारामागील विज्ञानाचा उलगडा

 


ऐरोली (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांनी जीवनात विज्ञानाची कास धरावी हा हेतु डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रबाले शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कारामागील विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन काल रबाले येथील नवी मुंबई मनपा माध्यमिक शाळा क्रमांक 104, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथे करण्यात आले होते.

काही लोक जाणीवपूर्वक लोकांमध्ये चमत्कारांचा भ्रम निर्माण करून त्यांचे शोषण करतात. विद्यार्थ्यांनी यापासून सावध व्हावे म्हणून तथाकथित चमत्कार सादर करून त्यामागचे विज्ञान यावेळी उलगडून दाखविण्यात आले. मंत्राने यज्ञ पेटविणे, पाण्याने दिवा पेटविणे या चमत्कारामागील रासायनिक प्रक्रिया समजावून सांगण्यासह रिकाम्या गडव्यातून तिर्थ काढणे व नारळातून करणी काढणे यामागचे तंत्र तसेच रिकाम्या हातातून उदी काढणे व प्रार्थनेने प्रसाद तयार करणे या मागची हातचलाखी समजावून सांगितली. यावेळी सुगत पनाड यांनी चमत्कार सादरीकरण केले, गजानंद जाधव व प्रा.अमोलकुमार वाघमारे यांनी विज्ञानपर प्रबोधनात्मक गीते गायली. तसेच अशोक निकम यांनी सुध्दा यात सक्रिय सहभाग नोंदवला.