भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही घेणार प्रभाग रचनेला आक्षेप!

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच या प्रभाग रचनेवर आपला आक्षेप नोंदवत याबाबत दाद मागण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता भाजपपाठोपाठ नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही या प्रभाग रचनेबाबत हरकती घेणार आहे.

ठाणे शहरातील प्रभाग रचनेवरून एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले असतांनाच, नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही प्रभाग रचनेबाबत तीव्र नाराजी दिसून येत आहे. ज्याठिकाणी चुकीची प्रभाग रचना असेल त्याठिकाणी आम्ही हरकती घेणार असल्याची माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करतांना आ. शशिकांत शिंदे  यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरसकट सर्व ठिकाणी हरकती घेण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र जिथे जिथे त्याठिकाणच्या लोकांना वाटतेंय की याठिकाणी चुकीची प्रभाग रचना आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे ज्या प्रभाग रचना अनुसरून नसतील तिथे आम्ही शंभर टक्के आक्षेप घेणार आहोत. या हरकती घेतल्यानंतर मग निवडणूक आयोग काय निर्णय घेईल. त्यानंतर पुढील भूमिका ठरवू असेही ते म्हणाले. काही ठिक़ाणी सगळ्या पक्षाची अगदी शिवसेनेच्या नगरसेवकांची बहतांश जणांची हरकती घेतल्या आहेत. आता वार्ड नुसार निवडणूक होत नाही तर प्रभागानुसार होत आहे. त्यामुळे तीन वार्डासाठी एक प्रभाग आहे. ही निवडणूक सामुदायिकपणाने झाल्यास चांगले होईल व महाविकास आघाडीसाठी वातावरण चांगले असल्याने तिन्ही वार्डाचे प्रभाग एकत्र झाल्यामुळे चांगल्याप्रकारचा निर्णय लागू शकतो असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.