वाशीतील गुरूनानकजी शिकवण स्तंभाचे आ. गणेश नाईक यांच्याहस्ते उद्घाटन

 

वाशी (प्रतिनिधी) - शीख पंथाचे संस्थापक गुरू नानकजी साहेब यांची शिकवण प्रदर्शित करणार्‍या स्तंभाचे उदघाटन आ. गणेश नाईक यांच्याहस्ते नुकतेच झाले. गुरूनानकजी यांच्या 550 व्या जन्मजयंती प्रकाश पर्वानिमित्त हा स्तंभ उभारण्यात आला आहे.

सायन-पनवेल महामार्गावरून वाशीत प्रवेश करताना हा स्तंभ दृष्टीपथास पडतो. वाशी गुरुद्वारा, दशमेश दरबार आणि सुप्रिम कौन्सिल नवी मुंबई यांच्या सहकार्याने तो निर्माण करण्यात आला आहे. वाशी गुरुद्वाराचे प्रमुख तेजंदर सिंग यांच्या संकल्पनेतून हा स्तंभ आकाराला आला असून आ. गणेश नाईक यांच्या सहकार्यातून महामार्गालगत महाराष्ट्र आणि देशातील पाहिला गुरू नानकजींचा शिकवण स्तंभ साकारला गेला आहे. या स्तंभाच्या निर्मितीमध्ये माजी महापौर सागर नाईक आणि माजी महापौर जयवंत सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तेजंदर सिंग म्हणाले. या कार्यक्रमास माजी खा. डॉ. संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक संपत शेवाळे, समाजसेवक विजय वाळुंज, समाजसेवक सुदत्त दिवे, सुप्रिम कौन्सिलचे जसपाल सिंग, कोपरखैरणे गुरूदवाराचे इंद्रजीतसिंग भाटीया तसेच दिघ्यापासून कळंबोली,लोढापर्यंत असलेल्या 11 गुरूदवारांचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. या स्तंभावर गुरूनानकजी साहेब यांची शिकवण एकुण चार भाषांमध्ये देण्यात आली आहे. पंजाबी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून त्यांचे मानव कल्याणाचे व एकतेचे विचार वाचता येणार आहेत.