नवी मुंबई (प्रतिनिधी) - सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचे कामकाज काल पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात झाले. गत वेळच्या सुनावणीस एमटीएनएलचे नोडल अधिकारी धोतरे हे उलटतपासणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात कोर्टाने वॉरंट काढले होते. त्यामुळे कालच्या सुनावणीस धोतरे हे हजर राहिले होते.
या सुनावणीदरम्यान, आरोपीच्या वकीलांनी उलट तपासणीत नोडल ऑफिसर धोतरे यांनी हजर केलेला जीपीआरएस सीडीआर लोकेशन कसे खोटे आहेत म्हणजे नियमानुसार एक वर्षापर्यंतचे सीडीआर द्यावेत असे असताना आपण त्यानंतरचे ही सीडीआर दिलेले आहे. त्यामुळेच ते खोटे आहेत याबाबत जोरदार युक्तिवाद कोर्टात केला. मात्र आपल्या चीफमध्ये दिलेल्या साक्षीत नोडल ऑफिसर धोतरे हे ठाम राहिले. कारण बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि मृत एपीआय अश्विनी बिंद्रे हे दोघेही एमटीएनएलचे मोबाईल फोन वापरत होते. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली, त्यादिवशी संध्याकाळी ठाणे रेल्वे स्टेशन पासुन कुरुंदकरच्या मिराभाईदर मधील फ्लॅट पर्यंत म्हणजे रात्री 11.30 वाजेपर्यंत अश्विनी बिद्रे यांचा मोबाईल बंद होईपर्यंत दोघे एकत्रच होते. त्याबाबतचा जीपीआरएस आणि सीडीआर पुरावा म्हणून कोर्टात सादर केला गेलेला आहे.
दरम्यान, कालच्या सुनावणीप्रसंगी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यासह एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो,आरोपी आणि आरोपींचे वकील हजर होते.पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे.