पनवेल (वार्ताहर) - पनवेल शहराजवळील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एका भेंडीच्या झाडाला काल सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागण्याची घटना घडली होती. मात्र त्याठिकाणाहून जाणार्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अदिती भागवत नावाच्या महिलेच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. तसेच इतर काही सतर्क नागरिकांनीही आपल्याजवळील बाटलीतील पाणी झाडावर ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती. एक जीवंत हिरवेगार झाड असहाय्यपणे आगीच्या भक्षस्थानी पडत होते. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी उपाय योजना करून सदरची ही आग विझवली. दरम्यान, सदर महिला डॉक्टरने दाखविलेल्या या सतर्कतेमुळे सदरचे हे झाड काही प्रमाणात वाचू शकले आहे.
डॉक्टर महिलेच्या सतर्कतेमुळे झाडाला मिळाले जीवदान