विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घ्या!

 


वाशी (प्रतिनिधी) - विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबईतर्फे वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय परिसरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्वाक्षरी अभियानातमोठ्या संख्येने विद्यार्थांनी स्वाक्षरी करत विद्यापीठ कायद्यातील बदलला आपला विरोध दर्शविला असल्याची माहिती जिल्हा कार्यालय मंत्री समीर शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 सुधारणा विधेयकाला विधिमंडळात बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात येत असून या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान अभाविपतर्फे राबविण्यात येत आहे. शुक्रवारी  वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय परिसरात हे अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा महाविद्यालय प्रमुख शुभम शिंदे, वाशी भाग मंत्री अंजली गुप्ता, समीर शिंदे, आकाश ठाकूर, वैष्णव वाळूज, साहिल मौर्य व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यापीठ कायदा सुधारणेनुसार आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाणार आहे. यामुळे कुलपतींचे अधिकार कमी करून विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढवण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून केला जात असून त्यामुळे या कायद्याला सध्या अभाविपसह विद्यार्थ्याचा विरोध होत आहे.