नवी मुंबई (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर दोन वर्षासाठी नवी मुंबई पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असून त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे.
गायकवाड यांच्यावर यापूर्वी 35 ते 40 विविध स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. पनवेल महापालिकेत वादग्रस्त नगरसेवक अशीच काहीशी ओळख निर्माण झालेले गायकवाड यांनी ते पनवेल महापालिकेचे उपमहापौर असताना पालिकेच्या अधिकार्यांना शिव्या दिल्याची क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यावेळी याप्रकरणी विरोधी पक्षाने गायकवाड यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करून गत वर्षातील डिसेंबर महिन्यात त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. यावेळी या सोहळ्यात हजेरी लावलेल्या मास्क न लावण्यासह सोशल डिस्टिंग नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकारही घडला होता व याबाबतचा व्हिडीओही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी गायकवाड यांच्यासह इतरांविरोधात पोलिसांनी साथरोग अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती. बेकायदेशीर मोर्चे व शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध देखील गायकवाड यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. यामुळे या भागात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. ही सर्व पार्श्वभुमी लक्षात घेवून पोलिसांनी अखेर गायकवाड यांना ठाणे, नवी मुंबई व पनवेल तालुका हद्दीतून तसेच रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करत चांगलाच दणका दिला आहे.
दरम्यान, माझ्यावरील ही कारवाई हेतू पुरस्काराने केली आहे. सदर तडीपारीचे आदेश मी स्वीकारले आहेत. विमानतळ नामकरण आंदोलनामध्ये मी केलेल्या भाषणांमुळे माझ्यावर ही कारवाई केली असल्याचे जगदीश गायकवाड यांनी सांगितले.