वासुदेव आला हो वासुदेव आला.... तब्बल दोन वर्षानंतर वासुदेव खेडेगावात दाखल

 

पनवेल (वार्ताहर) - वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला! हे गाणे कानावर पडले की पहाटे गाव जागविणारा, झोपेतून उठविणारा वासुदेव आठवतो. गळ्यात कवड्यांच्या माळा, अंगावर रंगीबेरंगी कपडे, दोन्ही हातात तांब्याचे कडे, हातामध्ये चिपळ्या, कपाळावर, कंठावर, गंधाचे टिळे आणि डोक्यात मोरपिसाची टोपी असा हा आपलासा वाटणारा वासुदेव. आता पुन्हा एकदा खेडेगावात भल्या पहाटे आपली हजेरी लावतांना दिसत आहे. 

मागील दोन वर्षापासून कोरोनाने सर्वत्रत थैमान घातल्यामुळे वासुदेव लुप्त होण्याच्या मार्गावर दिसून येत होता. त्याच दर्शन दुर्मिळ होत चालले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागला असल्याने वासुदेवाचे खेडेगावात आगमन होवू लागले आहे. वासुदेव ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. मात्र ही परंपरा टिकविण्यासाठी सध्या कोणीही धजावत नाही. शहरी भागात,सोसायटीमध्ये त्याचा विसर पडला आहे. मात्र खेडेगावात वासुदेवाला दानधर्म करणारी जाणकार मंडळी कडून सन्मान होत असून त्याव्दारे आजही भारतीय संस्कृती जोपासली जात आहे.