बोनकोड्यात मुख्य रस्त्यावर गॅरेजचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

 


कोपरखैरणे (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास होत असतांनाच अनेक ठिक़ाणी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या गॅरेजसमुळे या कोंडीत भरच पडतांना दिसत आहे. शंकर शिनवार दळवी आरोग्य केंद्र बोनकोडे से-12 व 10 या ठिकाणी समोरील संपूर्ण मुख्य रस्त्यावर दुतर्फा व फुटपाथवर अनधिकृत गॅरेजची कामे चालत असल्यामुळे रस्त्यावर पडणार्‍या ऑईल, ग्रीस व इतर कचर्‍यामुळे सध्या हा परिसर अस्वच्छमय बनला असून त्याचा येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेवून, बोनकोडेतील अनधिकृत गॅरेजसवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन दि.9 फेबु्रवारी रोजी भाजप अनुसुचित जमाती मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजय भवारी यांनी महापालिका आयुक्तांना सादर केले होते. मात्र तक्रारी करूनही यााठिकाणच्या गॅरेजसवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे ही समस्या मार्गी लागावी यासाठी संजय भवारी यांनी पुन्हा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना स्मरणपत्र धाडून सदरठिकाणच्याप गॅरेजवर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत याबाबत महापालिकेकडून कायदेशीर कार्यवाही करून सदरची गॅरेजस बंद करावीत, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल असा इशाराही स्मरणपत्रातून देण्यात आला आहे.

गॅरेजच्या समस्येसह वार्ड क्र.50 मधील सार्वजनिक शौचालयाची देखील मोठ्या प्रमाणात दूरावस्था असून ही बाबही यापूर्वीच प्रशासनाच्या निदर्शनास भवारी यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मात्र त्याबाबतही अद्याप कोणतीही उपाय योजना झाली नसल्याने ही समस्याही प्रशासनाने मार्गी लावून येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.