नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करताना ऐरोली पश्चिम भागात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे त्या विशिष्ट पक्षाला निवडणुकीत फायदा मिळवून देण्यासाठी या भागात जास्त प्रभागांची वाढ करण्यात आली असल्याचा आरोप आ. गणेश नाईक यांनी काल वाशी नवी मुंबई स्पोटर्स असोसिएशन येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
लोकसंख्येचे निकष पायदळी तुडवून नवी मुंंबईतील अनेक प्रभागांमध्ये सदोष प्रारुप रचना झाली असून ही सदोष प्रभाग रचना बदलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्य निवडणुक आयोगाची मार्गदर्शक तत्वे, महापालिका प्रांतिक अधिनियम, उच्च व सर्वोच्च न्यायालय यांचे निर्देश यांचे सर्रास उल्लंघन यात करण्यात आले असून ही सदोष प्रभाग रचना रद्द करावी. याकरिता हरकती आणि सूचना दाखल केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोग त्यांची दखल घेऊन नियमानुसार बदल करेल अशी आशा व्यक्त करतांना जर न्याय मिळाला नाही तर नवी मुंबईच्या हितासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी आहे अशी माहिती आ. गणेश नाईक यांनी यावेळी दिली.
ऐरोलीचे माजी आ. संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे माजी सभापती अनंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सागर नाईक यांनी महापालिकेच्या अधिकार्यांनी कशाप्रकारे सदोष प्रभागरचना केलेले आहे याचे सादरीकरण करून नियमानुसार प्रभाग रचना कशी असायला हवी होती याचा आराखडा सादर केला. पालिकेची निवडणुक एप्रिल 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्रिस्तरीय पॅनल पध्दतीने ही निवडणूक होणार असून पूर्वीच्या 111 प्रभागांमध्ये 11 नवीन प्रभागांची भर पडून एकुण 122 वॉर्ड झाले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहिर करण्यात आली. त्यामधील प्रचंड घोळ तसेच विशिष्ट राजकीय पक्षांना अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी हेतुपुरस्सर झालेला प्रयत्न पहाता या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडला. अन्य महापालिकांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजेच 3852 हरकती आणि सुचना दाखल करण्यात आल्या आहेत. आपल्या सादरीकरणामध्ये सागर नाईक यांनी जाणूनबुजून प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचे सांगितले.
या सदोष प्रभाग रचनेत नागरिक आणि मतदार यांना सोयी सुविधा देताना अडचन निर्माण होणार आहे. एका प्रभागाचे दोन प्रभागात कारण नसताना विभाजन करण्यात आले आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना प्रभागांमध्ये समन्वय राखताना अडचण निर्माण होणार आहे. ऐरोली पश्चिम येथील दोन लाख 28 हजार 779 लोकसंख्येसाठी पाच सदस्य संख्या वाढविण्यात आली आहे तर उर्वरित 8 लाख 91 हजार 768 लोकसंख्येसाठी फक्त सहा सदस्य संख्या वाढविण्यात आली आहे. म्हणजेच 20 टक्के लोकसंख्येसाठी जास्त आणि 80 टक्के लोकसंख्येसाठी कमी सदस्य संख्या वाढविण्यात आली आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली. शहराची एकूण लोकसंख्या भागिले 122 प्रभाग हे समीकरण वापरून प्रभागाची सरासरी लोकसंख्या काढण्यात येते. त्यानुसार नवी मुंबईत प्रभागाची लोकसंख्या 27555 अशी येते. यामध्ये दहा टक्के कमी किंवा दहा टक्के अधिक अशी लोकसंख्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित करण्यात येते. नवी मुंबईत वाढलेल्या एकूण अकरा प्रभागांची समप्रमाणात वाटणी शहरात होणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आलेले नाही. उत्तरेकडून प्रभाग रचना करताना ऐरोली पश्चिमेत 24 हजार ते 25 हजार लोकसंख्येचे लहान प्रभाग करून या भागात प्रभागांची वाढ करण्यात आली आहे. याचा विपरीत परिणाम बेलापूर कडील प्रभागांमध्ये झाला असून या भागात प्रभागांच्या लोकसंख्येने सरासरी मर्यादा ओलांडली असून 31 हजारापर्यंत मोठे प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचे निकष पाळण्यात आले नाहीत. किंबहूना जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात कमी लोकप्रतिनित्व राहणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.
ऐरोली पश्चिम भागात 2015 साली 12 सदस्य निवडून आले होते. या भागाची लोकसंख्या 1,27,761 एवढी आहे. या भागात जाणीवपूर्वक मुख्य रस्ता सीमारेषा न ठेवता छोट्या गल्ल्या सीमारेषा ठेवून सरासरीपेक्षा कमी लोकसंख्येचे प्रभाग करण्यात आले आहेत त्यामुळे या भागात 14 ऐवजी पंधरा सदस्य संख्या करण्यात आलेली आहे ही वाढ अनुचित असून निकषाप्रमाणे या भागात 14 सदस्य संख्या करावी अशी मागणी सागर नाईक यांनी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वस्त्यांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. या नियमाचं पालन करण्यात आलं नाही. रबाळे येथील इलठण पाडा या विभागाचे तीन तुकडे करण्यात आले आहेत. आंबेडकर नगर ही वस्ती अनुसूचित जाती असलेली आहे. लोकसंख्येचे निकष वाढल्याने ही वस्ती एकाच प्रभागात समाविष्ट करता येऊ शकते. परंतु आवश्यकता आणि परिस्थिती नसताना या वस्तीचे विभाजन करण्यात आले आहे. तुर्भे स्टोअर, नेरूळ से- 10, बेलापूर गाव यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे. प्रारुप प्रभाग रचनेत नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करण्यात आलेला नाही. रबाळे परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्याचे विभाजन केले आहे. येथील दोन वस्त्यांमधील अंतर तब्बल 7.5 किलोमीटर एवढ लांब झाले आहे.् भौगोलिक दृष्ट्या हा प्रभात शिळफाटा रोडपर्यंत आटोपशीर ठेवणे आवश्यक होते तो तसा ठेवण्यात आलेला नाही. प्रभाग रचना करताना प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाने स्मशानभूमी बाजारहाट पाणी पुरवठा शाळा मैदाने एकाच प्रभागात ठेवण्याचे निर्देश असताना ऐरोली गाव, ऐरोली से 16, तुर्भे स्टोअर, कुकशेत गाव व अन्य प्रभागातील सुविधांचे मनमानी पद्धतीने विभाजन केले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची सुविधांसाठी परवड होणार आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये राज्य निवडणुक आयोग, महापालिका अधिनियमातील तरतूदी, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे पालन करून अंतिम प्रभाग रचना करावी अशी मागणी आ. गणेश नाईक यांनी यावेळी केली. महापालिकेच्या काही अधिकार्यांनी सत्ताधार्यांच्या दबावाखाली विशिष्ट पक्षाला निवडणुकीत लाभ मिळवून देण्यासाठी नियमबाह्य तार्किक मनमानी पद्धतीने प्रारुप प्रभाग रचना केलेली आहे. या अधिकार्यांच्या चौकशीची मागणी देखील आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक आयोग सदोष प्रभाग रचना बदलून नियमानुसार दुरुस्त्या करेल असा विश्वास आहे. मात्र जर तसे झाले नाही तर संविधानिक अधिकारानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.