पंतप्रधानांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे नेरूळमध्ये निषेध

 


नेरुळ (प्रतिनिधी) - कोरोना महामारी संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून यामुळे महाराष्ट्राचा जाणिवपूर्वक अपमान झाला असल्याचे सांगत नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्यावतीने नेरुळ से- 2 परिसरातील चौकात काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करून पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

मोदींच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याने त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ही मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. कोरोना काळात रहिवाशी आपल्या राज्यात ये-जा करत होते, त्यामुळे कोरोनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सरकारबाबत वक्तव्य केले. हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून यावेळी करण्यात आला आहे.  यावेळी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक,नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत, जिल्हा सचिव संध्या कोकाटे, विद्या भांडेकर यांची समयोचित भाषणे करत आपला निषेध नोंदविला. पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी मोदी हटाव, देश बचाव, माफी मागा - महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, नाही चालणार-नाही चालणार, मोदींची हुकूमशाही नाही चालणार यासह विविध घोषणा देवून पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा यावेळी काँग्रेसजनांनी निषेध केला.  यावेळी आंदोलनात माजी नगरसेविका मीरा पाटील, काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे नवी मुंबई अध्यक्ष अनवर हवलदार, सचिन नाईक, प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, उत्तम राक्षे, मारूती माने, वामन रंगारी, महेश भणगे, संतोष पाटील, बागाव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.