पनवेल (प्रतिनिधी)- कोरोना महामारी संदर्भात बोलतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटतांना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेळ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा अध्यक्ष आर.सी.घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या पुतळयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
आंदोलनाच्या सुरुवातीला पनवेल येथील काँग्रेस भवनमध्ये कोकणचे भाग्यविधाते व माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या 93व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते जी. आर. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू स्व. बाळाराम पाटील, भारतरत्न लता मंगेशकर व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. या निषेध आंदोलन प्रसंगी पनवेल शहर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी मोदी सरकारवर जहरी शब्दात टीका केली.
या प्रसंगी अरविंद सावळेकर, शशिकांत बांदोडकर, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अरुण कुंभार, डॉ. धनंजय क्षीरसागर, जयेश लोखंडे, जयदास पाटील,डॉ. भक्ती कुमार दवे, मोती बांठीया आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.