तुर्भे एमआयडीसीतील वॉटर बोट बनविणारी कंपनी जळून खाक

 


तुर्भे (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील लिटमस मरीन इनोव्होशन प्रा.लिमिटेड (प्लॉट नं- डी 7/2) नावाच्या फायबर वॉटर बोट बनविणार्‍या कंपनीला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून सदरच्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीची व्यापकता पाहून या परिसरात घबराट पसरली होती. मात्र रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाचे फायर अधिकारी (एफ एफएसओ) रायबा पाटील व त्यांची टीम तसेच नेरुळ एमआयडीसी  व नवी मुंबई महापालिकेच्या वाशी अग्निशमन दलाने तत्परता दाखवत मध्यरात्री तीन वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.

तुर्भे एमआयडीसीतील प्लॉट नं- डी 7/2 येथे लिटमस मरीन इनोव्होशन प्रा.लिमिटेड नावाची कंपनी असून या कंपनीत फायबर वॉटर बोट बनविण्याचे काम चालते. काल मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे कंपनीला आग लागली. आग लागताच कर्मचार्‍यांनी बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.

या घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी,नेरुळ एमआयडीसी व नवी मुंबई अग्निशमन दलाच्या बंबानी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मात्र सदरची ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकले नसल्याचे रबाळे एमआयडीसीतील फायर अधिकारी रायबा पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या आगीत सदरची कंपनी पूर्ण जळून खाक झाल्याने कंपनीतील बोटीसह इंजिनही जळाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नूकसान झाले आहे.  या घटनेमुळे कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.