पनवेल (प्रतिनिधी) - पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिकेने ’माझी वसुंधरा’ व ’स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन काल त्यांच्याहस्ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. जवळपास शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपमहापौर सिता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग अ समिती सभापती संजना कदम, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका सुशिला घरत, नगरसेवक अब्दुल मुकीद काझी, उपआयुक्त विठ्ठल डाके, उपआयुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त् डॉ. वैभव विधाते, स्वच्छ भारत कोऑर्डीनेटर मधुप्रिया आवटे , सदाकत अली तसेच अधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील वय वर्षे नऊ ते सत्तर वर्षापर्यंतच्या अबालवृध्दांनी रोजच्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून सजावटीच्या तसेच उपयोगी वस्तू केल्या आहेत. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला दिसून आला. तसेच खारघर येथील कोलाज आर्टिस्ट अदिश जैन यांनी दैनिकात आलेल्या बातम्यांचे-चित्रांचे कात्रण काढून तयार केलेल्या विविध राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरावरील कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. जवळपास शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यामध्ये कागदापासूनच्या दुचाकी, चारचाकी गाड्या, बाहुल्या, फुले, तेलाच्या रिकाम्या डब्यापासून फुलांच्या कुंड्या, निरूपोयगी टायर पासून बसण्याच्या खूर्च्या, जुन्या काचेच्या बाटल्यांपासून लॅम्प, फ्लॉवर पॉटस्, सुतळ्यांपासून शो’च्या वस्तू, जुन्या कापडापासून पायपुसण्या अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून स्पर्धेत यशस्वी होणार्या स्पर्धकांना वैयक्तिक विभागात पहिले बक्षीस पाच हजार, द्वितीय बक्षीस तीन हजार, तृतीय बक्षीस दोन हजार, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे तसेच सांघिक विभागात पहिले बक्षिस अकरा हजार, द्वितीय बक्षीस पाच हजार, तृतीय बक्षीस दोन हजार, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, देऊन गौरविण्यात येणार आहे.